राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असतानाही जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. बुधवारी 37 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीचा निकाल हाती आला. या निवडणुकीत काँग्रेसने 37 पैकी 24 जिल्हा परिषद अध्यक्षपदे जिंकली आहेत. तर भाजपाच्या वाट्याला अवघ्या सात जिल्हा परिषदा आल्या आहेत. दोन जिल्हा परिषदांमध्ये भारत आदिवासी पार्टीचा अध्यक्ष निवडून आला आहे, तर एक जिल्हा परिषद राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीच्या वाट्याला आली आहे.
## 37 पैकी 24 जागांवर काँग्रेसचा विजय
राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आहे आणि भाजपचे भजनलाल शर्मा हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र सत्ता असूनही या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. झालावाडमधून भाजपच्या वर्षा झाला यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. बालोतरामधून भाजपच्या सुशीला भील या विजयी झाल्या आहेत. चुरूमधून कनिका सिंह राठोड, प्रतापगढमधून हरकरी मीणा तर अजमेरमधून पूजा भंसाली यांचा विजय झाला आहे.
## मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसचा विजय
या निकालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जिल्हाही या तडाख्यातून सुटला नाही. भरतपूरमधून काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार रेणू बाला या विजयी झाल्या आहेत. भरतपूरमध्ये भाजप उमेदवाराला 14 तर काँग्रेसला 17 मते पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाला जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत एवढा मोठा पराभव पत्करावा लागल्याने या निकालाची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा