पुण्यात शहर फ्लेक्समुक्त करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेली ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम आता एका अनोख्या उपक्रमामुळे चर्चेत आली आहे. अनधिकृत फ्लेक्सविरोधात नागरिकांना ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने आता ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सच्या बाबतीत सत्ताधारी भाजपचेच नेते अव्वल ठरले आहेत. यामध्ये पहिला क्रमांक थेट महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पटकावला आहे.
तीन किताब कोणाला मिळाले
‘माननीय’ श्रेणीत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले यांना ‘साहेब’ हा किताब देण्यात आला आहे. त्यांचे फ्लेक्स संपूर्ण शहरात झळकत असल्याचा उल्लेख यादीत करण्यात आला आहे. नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांना ‘दादा’ हा किताब मिळाला असून, त्यांचे फ्लेक्स प्रत्येक चौकात दिसत असल्याची टिप्पणी करण्यात आली आहे. तर सुनील नामदेव पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब देण्यात आला आहे. त्यांचे फ्लेक्स गल्लीबोळांतही पोहोचल्याचे यादीत नमूद केले आहे.
पुरस्कारामागची मोहीम
श्रीनाथ भिमाले हे शहराच्या विकासकामांसह आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक फ्लेक्स लावणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे अनधिकृत फ्लेक्सच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा