बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर आज यशाच्या शिखरावर आहे. ‘आशिकी 2’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘छिछोरे’ आणि ‘स्त्री 2’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीलाच लागोपाठ दोन चित्रपट अपयशी ठरल्याने तिच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
शिक्षण अर्धवट सोडून अभिनयाकडे वळण
श्रद्धा ही ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर आणि अभिनेत्री शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे. प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली असली तरी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तिला संघर्ष करावाच लागला. मुंबईत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात मानसशास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. मात्र अभिनयाची आवड मनात असल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडले आणि मुंबईत परतली. त्यानंतर तिने चित्रपटांसाठी ऑडिशन्स देण्यास सुरुवात केली.
दोन अपयशांनंतर ‘आशिकी 2’ने बदलले नशीब
2010 मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि आर. माधवन यांसारखे कलाकार होते, तरीही तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. 2011 मध्ये आलेला ‘लव्ह का द एंड’ हाही अपेक्षित यश मिळवू शकला नाही. सलग दोन चित्रपट अपयशी ठरल्याने तिच्या करिअरसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
तिच्या करिअरला खरी दिशा मिळाली ती दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या ‘आशिकी 2’मुळे. या चित्रपटाची ऑफर मिळण्यापूर्वी तिने यशराज फिल्म्ससोबत करार केला होता. मात्र ‘आशिकी 2’मध्ये काम करण्यासाठी तिने ‘औरंगजेब’ हा चित्रपट नाकारला आणि यशराज फिल्म्ससोबतचा करारही संपवला. तिचा हा निर्णय करिअरसाठी निर्णायक ठरला. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’ने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. आदित्य रॉय कपूरसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना आवडली आणि आरोहीच्या भूमिकेमुळे ती रातोरात लोकप्रिय झाली.
त्यानंतर ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी २’, ‘बागी’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘छिछोरे’ आणि ‘स्त्री’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपली प्रसिद्धी वाढवली. आता ती मराठी लोककलेतील ज्येष्ठ तमाशा आणि लावणी कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून श्रद्धा यात विठाबाईंची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने विशेष मेहनत घेतली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा