शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाल्याने अस्पृश्यतेचा कलंक पुसला जात नाही; त्यासाठी सामाजिक समतेची लढाई कायम लढावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी मांडली आहे. एका विशेष कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी जातिव्यवस्था, दलित साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील आव्हानांवर मनमोकळेपणाने भाष्य केले.
पद आणि कलंक यावर स्पष्ट भूमिका
आपल्या ‘सनातन’मधील सिद्धनाकच्या कथेतून अस्पृश्यतेची वेदना मांडताना, कितीही स्नान केले तरी अस्पृश्याला अस्पृश्यच ठरवले जात असल्याची जातिव्यवस्थेतील विडंबना त्यांनी अधोरेखित केली. एखाद्या पदावर पोहोचल्याने जातीय कलंक मिटत नसून सामाजिक परिवर्तनासाठी दीर्घ संघर्ष आवश्यक असल्याचे लिंबाळे म्हणाले. दलित साहित्यामुळे वाचकांना जातिव्यवस्थेतील अन्याय समजला आणि पुस्तके समाज बदलू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ज्या विचारधारेच्या विरोधात ४५ वर्षांपूर्वी विद्रोही भूमिका घेऊन आलो, आज त्याच साहित्याच्या सर्वोच्च व्यासपीठावर अध्यक्षपदी निवड झाल्यावर कसे वाटते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर लिंबाळे म्हणाले की, याचा मोठा आनंद आणि सन्मान वाटतो. अस्पृश्य आणि दलित म्हणून जन्मलो, त्यामुळेच संघर्ष करू शकलो आणि गुलामीविरुद्ध उठाव करू शकलो. सवर्ण समाजात जन्मलो असतो तर हा क्रांतिकारक प्रवास करता आला नसता. हा सामाजिक न्यायाच्या लढाईचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा गौरव असून फुले-आंबेडकरांनी पाहिलेले स्वप्न पुढे नेण्याचा हा क्षण आहे.
चळवळीतील गटबाजीवर खंत
आंबेडकरी चळवळीत वाढलेल्या गटबाजीमुळे समाजाचे मोठे नुकसान होत असल्याची खंतही लिंबाळे यांनी व्यक्त केली आहे. दलित पँथरच्या काळात समाजात असलेले मानसिक ऐक्य आज संपुष्टात आल्याचे सांगत, चळवळीतील गटबाजी आणि ट्रोलर्सवर त्यांनी जोरदार टीका केली. समाजाला पुढे नेणाऱ्या लेखक आणि कार्यकर्त्यांची ताकद टीका करण्यात वाया घालवू नका, असे आवाहनही लिंबाळे यांनी केले आहे.
लिंबाळे यांनी आंबेडकरी चळवळीने नव्या प्रगतिशील तरुणांना सोबत घेऊन जातीय व्यवस्थेविरोधातील लढाई लढण्याची गरज व्यक्त केली आहे. आज बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा विचार समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचला असून, दलित चळवळीने आपले मित्र वाढवले पाहिजेत आणि अंतर्गत संघर्ष कमी केले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले. मतांची ताकद परिवर्तनासाठी वापरली गेली तरच राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकते, असेही लिंबाळे म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा