पुण्यात गेल्या दोन वर्षांत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याची चिंता खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. शहराची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली असून, पुण्याचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
सुळे यांच्या मते, देशात गुन्हेगारीच्या बाबतीत पुणे पाचव्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी येणे स्वाभाविक असल्याचे त्या म्हणाल्या. टीका करणे किंवा राजकारण करणे हा आपला हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इन्फो टेक पार्क आणि सहा लाख कर्मचारी
पुण्यातील माहिती तंत्रज्ञान केंद्रात सुमारे सहा लाख लोक काम करतात, याकडेही सुळे यांनी लक्ष वेधले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक काम करत असलेल्या शहरात सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनतो, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुण्याच्या पालकमंत्री आहेत. त्यामुळे सुळे यांनी केलेल्या या मागणीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
याच दिवशी न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्याची घटना घडली. शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना असल्याचे सुळे यांनी म्हटले. भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि हल्ला करण्याची हिंमत हल्लेखोरांना होतेच कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही, हेच यातून दिसते, असे त्या म्हणाल्या.
गेल्या काही काळात पुण्यात कोयता गटाची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट पुण्यात शिल्लक आहे की नाही, असा प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत असल्याचे सुळे यांनी आपल्या संदेशात म्हटले होते.
रोहित पवारांच्या आंदोलनावर काय म्हणाल्या
पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाबाबतही भाष्य केले. रोहित पवार यांचे आंदोलन कुठे आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्या म्हणाल्या. उद्या आपली बैठक असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाबद्दल माहिती नसल्याचे स्पष्ट केले. शशिकांत शिंदे यांना विचारा, असे सांगत त्या म्हणाल्या की, आपण पक्षाच्या अध्यक्षा नाही. पक्षाची भूमिका शशिकांत शिंदे ठरवतात आणि पक्ष सांगेल ते आपण करत असतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा