पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, कोडिंग आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी लोणीकंद शाळेतील श्रीराज शिंदे आणि आरोही उजगरे यांची दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याची चमकदार कामगिरी
करेगाव आणि लोणीकंद येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांत यश मिळविले. करेगाव जिल्हा परिषद शाळेतील ५६ विद्यार्थ्यांनी फियाटच्या सहकार्याने स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी दोन संघांनी पहिल्या दहामध्ये, तर एका संघाने पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील १५८ विद्यार्थ्यांनी झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने सहभाग घेतला असून त्यापैकी दोन संघांनी पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले. उद्योजकता आव्हान आणि फोक रेस या प्रकारांत विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली.
सोलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार
लोणीकंद शाळेतील इयत्ता सहावीतील श्रीराज अभिजित शिंदे आणि सातवीतील आरोही रामचंद्र उजगरे यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी ‘स्कोव्हेरा’ हे बहुभाषिक शालेय अॅप विकसित केले आहे. इंटरनेटशिवाय कार्यरत असलेल्या या अॅपद्वारे उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक संवाद सुलभ करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. फोक रेस आणि गर्ल्स फायर फायटिंग या स्पर्धांमध्येही ते सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा