देशातील सर्वात मोठा बाटलीबंद पाण्याचा ब्रँड असलेल्या बिसलेरी कंपनीवर अन्न सुरक्षा प्राधिकरणाने कारवाई केल्यानंतर एक मजेशीर प्रकार उघडकीस आला आहे. गाझियाबाद येथे अन्न सुरक्षा प्राधिकरणानेच आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात टेबलावर बिसलेरीच्याच पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्या वापरल्या गेल्याचे समोर आले आहे. एकीकडे बिसलेरीवर बंदीच्या बातमीने खळबळ उडाली असताना दुसरीकडे प्राधिकरणाच्याच कार्यक्रमात तोच ब्रँड दिसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
कार्यक्रमात काय आढळले
गाझियाबादच्या एनटीसीएफएसएस येथे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्य खाद्य सुरक्षा प्राधिकरणांच्या १,१५५ खाद्य सुरक्षा संस्थांनी भाग घेतला होता. हा प्रशिक्षण कार्यक्रम अन्न सुरक्षा आणि मानकांशी संबंधित विक्रीवरील बंदी व निर्बंधांच्या नियमांवर आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बिसलेरीच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी देशव्यापी पाहणी आणि एका बॅचच्या विक्रीवरील बंदीचे प्रकरणही चर्चेत होते. याच दरम्यान टेबलावर बिसलेरीच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आले.
कंपनीचे स्पष्टीकरण काय
बिसलेरी इंटरनॅशनलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, एफएसएसएआयने २३ नोव्हेंबरला दिलेल्या स्पष्टीकरणाचे कंपनी स्वागत करते. कंपनीच्या मते गोवा प्लांटमध्ये १४ महिन्यांपूर्वी तयार केलेल्या एका बॅचच्या नमुन्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. कंपनीने सांगितले की, एफएसएसएआयची विक्रीवरील बंदी केवळ एकाच बॅच ‘जीओ २७०’ वर लागू आहे. ही बॅच २७ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा प्लांटमध्ये तयार करण्यात आली होती. बिसलेरीच्या मते कंपनी दरवर्षी ५० हजारांहून अधिक बॅच तयार करते आणि संबंधित बॅचचा कोणताही स्टॉक सध्या बाजारात उपलब्ध नाही. कंपनीने आपल्या सर्व १४३ प्लांटमध्ये गुणवत्ता आणि खाद्य सुरक्षेचे उच्च मानक कायम राखण्याची बांधिलकी दर्शवली आहे. दरम्यान, सेलिब्रिटींकडून पान मसाला आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नाच्या जाहिरातींबाबतही एफएसएसएआयचे सीईओ राजित पुनहानी यांनी आपले मत मांडले. त्यांनी या जाहिरातींमधील भ्रामक दावे आणि नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा