पाचशे कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेले एसआयटीचे पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत दिले, असा उल्लेख या कथित ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करण्याची घोषणा केली होती.
या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप दोन वर्षे जुनी असल्याचा दावाही कदम यांनी केला होता.
अंतरवालीत काय घडले
समोर आलेल्या माहितीनुसार एसआयटीचे पथक अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्याचे कळताच मनोज जरांगे पाटील यांनी आपला छत्रपती संभाजीनगर येथील दौरा आटोपून तातडीने अंतरवाली सराटीकडे प्रस्थान केले. एसआयटीचे कोणीतरी आले आहे आणि त्यांचा आपल्याला फोन आला होता, अशी माहिती यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिली. दरम्यान, आता या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांच्या चौकशीचीही मागणी केली आहे. या प्रकरणात एसआयटीच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा