हिवाळा सुरू झाला की अनेकांच्या घरात एकच तक्रार ऐकायला मिळते — घर नुकतेच स्वच्छ केले, तरी फर्निचरवर, फरशीवर आणि इतर पृष्ठभागांवर लगेचच धुळीचा थर दिसू लागतो. साफसफाई करूनही धूळ काही केल्या कमी होत नाही, असे अनेकांना वाटते. यामागे हिवाळ्यातील हवामान आणि घरातील वातावरण ही कारणे आहेत.
थंडीत धूळ जास्त का साचते?
हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी दारे आणि खिडक्या दीर्घकाळ बंद ठेवली जातात. त्यामुळे घरात ताजी हवा येण्याचे प्रमाण कमी होते आणि हवेचे अभिसरण थांबते. परिणामी घरात धूळ अधिक प्रमाणात साचते. थंड आणि कोरड्या हवेसोबतच गरम ठेवणाऱ्या यंत्रणांमुळे घरातील आर्द्रता आणखी कमी होते. त्यामुळे धुळीचे बारीक कण हवेत मोकळेपणाने तरंगतात आणि पृष्ठभागांना चिकटून बसतात.
हिवाळ्यात लोक घरात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे गळणारी मृत त्वचा आणि केस घरातील धुळीत भर घालतात. घरात पाळीव प्राणी असतील, तर त्यांची कोरडी त्वचा, केस आणि कोंडा यामुळेही धूळ वाढते. शिवाय हीटिंग यंत्रणा जास्त काळ चालू राहिल्याने जमिनीवर साचलेली धूळ पुन्हा हवेत मिसळते आणि घराच्या इतर भागांत पसरते. लाकूड जाळणारी शेगडी वापरली जात असेल, तर त्यातून निघणारी राख आणि अतिसूक्ष्म कणही धुळीत मिसळू शकतात.
धूळ कमी करण्यासाठी काय करावे?
घरातील धूळ कमी करण्यासाठी हीटिंग यंत्रणेचा फिल्टर नियमितपणे बदलणे महत्त्वाचे आहे. फिल्टर घाण झाला, तर तो हवेतील धूळ प्रभावीपणे अडकवू शकत नाही आणि यंत्रणेवर अधिक ताण पडतो. एक इंच जाडीचा फिल्टर असेल, तर तो किमान दर तीन महिन्यांनी बदलण्याची शिफारस केली जाते. चार ते पाच इंच जाडीचे फिल्टर जास्त काळ टिकू शकतात. हिवाळा सुरू होण्यापूर्वी यंत्रणेची व्यावसायिक सर्व्हिसिंग करून घेणेही फायदेशीर ठरते. त्यामुळे यंत्रणा कार्यक्षमतेने चालते आणि घरातील हवा स्वच्छ राहण्यास मदत होते.
एअर व्हेंट्स आणि एअर रिटर्न्ससमोर फर्निचर किंवा इतर वस्तू ठेवल्याने हवेच्या प्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे यंत्रणेला जास्त काम करावे लागते. म्हणून व्हेंट्ससमोर सुमारे सहा ते बारा इंच जागा मोकळी ठेवण्याचा प्रयत्न करावा. हिवाळ्यात हवा कोरडी होते. घरातील आर्द्रता सुमारे ३० ते ५० टक्के असणे आरामदायक मानले जाते. त्यामुळे धुळीचे कण हवेत तरंगत राहण्याऐवजी लवकर खाली बसतात. गरज भासल्यास ह्युमिडिफायरचा वापर करता येतो. काही लोक घरात झाडे लावून किंवा स्टोव्हवर पाणी गरम करूनही आर्द्रता वाढवतात.
घर स्वच्छ करताना केवळ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर धूळ फुंकून काढणे हा योग्य मार्ग नाही. कोरड्या कापडाने धूळ झटकल्यास लहान कण हवेत पसरू शकतात. त्याऐवजी किंचित ओलसर मायक्रोफायबर कापड वापरावे. त्यामुळे धूळ कापडाला चिकटून राहते आणि नंतर धुवून काढता येते. फरशीसोबतच सोफा, पडदे, उशा आणि गाद्या यांसारख्या मऊ पृष्ठभागांवरही धूळ लपते, त्यामुळे त्या जागाही नियमितपणे स्वच्छ कराव्यात.
प्रतिक्रिया व्यक्त करा