महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला स्पष्टपणे बसू लागला आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढल्याने घरखर्च सांभाळणे कठीण झाले आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर चांगले उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही या महागाईचा फटका बसत आहे. कांदा, साखर, तांदूळ, डाळी आणि खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
कांद्याच्या दरात सर्वात जास्त वाढ
गेल्या वर्षभरातील किराणा वस्तूंच्या किमती पाहिल्या तर कांद्याच्या किंमतीत सर्वात जास्त वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कांद्याचा किलोचा भाव २७ रुपये होता, तर आता तो ५४ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच कांद्याच्या किंमतीत जवळपास १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
साखरेच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४७ रुपये किलो असलेली साखर आता ६१ रुपयांवर पोहोचली आहे. कोथिंबिरीची किंमत ३७ रुपयांवरून ४५ रुपये, तर तूरडाळीचा भाव ११६ रुपयांवरून १३६ रुपये झाला आहे.
खाद्यतेल आणि तांदळाचे दरही वाढले
खाद्यतेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. सूर्यफूल तेलाचा दर १६५ रुपयांवरून १९१ रुपये, तर मोहरीच्या तेलाचा दर १८७ रुपयांवरून २१२ रुपये झाला आहे. तांदळाचे दर ४३ रुपयांवरून ४९ रुपये झाले आहेत. उडीद डाळ, लाल मिरची, अंडी, तूप आणि दुधाच्या किमतीतही वाढ नोंदवण्यात आली आहे.
एकीकडे बऱ्याच वस्तू महागल्या असताना बटाटा आणि टोमॅटोच्या दरात मात्र घट झाली आहे. बटाट्याचा दर २७ रुपयांवरून २३ रुपये, तर टोमॅटोचा दर ४५ रुपयांवरून ३८ रुपये झाला आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर पोहोचला असून अन्नधान्य महागाईचा दर ८.९४ टक्के नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात घरखर्चाचे गणित कसे सांभाळायचे, असा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
Leave a Reply