लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी चेहरा नितळ, मऊ आणि चमकदार दिसावा, अशी मुलींसोबतच मुलांचीही इच्छा असते. त्यामुळे लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच त्वचेची विशेष काळजी घेतली जाते. अनेक जण महागडी ब्युटी उत्पादने आणि रसायनयुक्त मॉइश्चरायझर वापरतात. मात्र, त्यासाठी भरपूर पैसे खर्च करण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून स्वतःच मॉइश्चरायझर तयार करता येते. यामुळे त्वचेला ओलावा मिळण्यास आणि डागांची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते.
लागणारे साहित्य आणि बनवण्याची पद्धत
या नैसर्गिक मॉइश्चरायझरसाठी २ चमचे ग्लिसरीन, २ चमचे एलोवेरा जेल, १ चमचा लिंबाचा रस, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एक चिमूटभर हळद लागते. प्रथम स्वच्छ आणि कोरडे काचेचे एअरटाइट कंटेनर घ्या. त्यात थोडी हळद आणि लिंबाचा रस घालून दोन्ही पदार्थ चांगले एकत्र करा. त्यानंतर त्यात ग्लिसरीन आणि अॅलोव्हेरा जेल घालून पुन्हा व्यवस्थित मिसळा. आता व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल फोडून त्यातील तेल या मिश्रणात टाका. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत चांगले मिसळा. तयार झालेले मॉइश्चरायझर स्वच्छ एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवता येते. साधारण १५ ते २० दिवस त्याचा वापर करता येईल.
कसे लावायचे आणि कोणती काळजी घ्यावी
फेसवॉशने चेहरा स्वच्छ केल्यावर त्वचा थोडी ओलसर असतानाच हे मॉइश्चरायझर वापरावे. चेहरा आणि मानेवर थोडे मॉइश्चरायझर घेऊन हलक्या हाताने मसाज करावा, जेणेकरून ते त्वचेवर व्यवस्थित पसरेल. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करूनही ते लावता येते. नियमित वापर केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास आणि त्वचा मऊ राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, त्वचेतील बदल प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळे असू शकतात. या मॉइश्चरायझरमध्ये लिंबाचा रस असल्याने संवेदनशील त्वचेवर जळजळ किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या आतील बाजूस थोडे मिश्रण लावून पॅच टेस्ट करावी. जळजळ, लालसरपणा किंवा खाज जाणवल्यास त्याचा वापर करू नये. हे मॉइश्चरायझर लावल्याने डाग नक्कीच कमी होतील किंवा त्वचेचा रंग बदलेल, असे समजू नये.
Leave a Reply