स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक घराची गरज असते. घरातील ज्येष्ठ मंडळी याबाबत नेहमीच आग्रह धरतात. मात्र रोजच्या धावपळीत काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते. स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या पदार्थांचा थेट परिणाम कुटुंबाच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे किचनची स्वच्छता ही केवळ दिसण्यापुरती नसून आरोग्याशी जोडलेली बाब आहे. नकळत होणाऱ्या काही चुका आरोग्य बिघडवू शकतात.
या पाच चुका टाळा
एकच कापड प्रत्येक कामासाठी वापरणे: हात पुसण्यासाठी, गरम भांडी धरण्यासाठी आणि ओटा पुसण्यासाठी अनेकजण एकच कापड वापरतात. घाणेरड्या कापडावरील जंतू अन्नात मिसळून आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक कामासाठी वेगळे स्वच्छ कापड वापरा आणि प्रत्येक वापरानंतर ते नीट धुवा.
हात न धुता फ्रिज उघडणे: दिवसभरात फ्रिजचा दरवाजा अनेकदा उघडला जातो. हात न धुताच दरवाजा उघडल्यास हातावरील घाण आणि जंतू हँडलला चिकटतात आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या हाताला लागतात. त्यामुळे फ्रिज उघडण्यापूर्वी हात धुवा आणि हँडल वेळोवेळी स्वच्छ करत राहा.
जुना स्पंज आणि स्क्रबर बदलायला विसरणे: भांडी घासण्याचा स्पंज किंवा स्क्रबर खराब होईपर्यंत अनेकजण वापरत राहतात. ओल्या स्पंजमध्ये जिवाणू आणि बुरशी वेगाने वाढतात. वेळेवर स्पंज बदलला नाही तर त्यातील जिवाणू भांड्यांवर पसरून आरोग्य बिघडवू शकतात.
कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे: कच्च्या भाज्या, मांस किंवा मासे शिजवलेल्या पदार्थांजवळ ठेवल्यास कच्च्या पदार्थांमधील जिवाणू शिजवलेल्या अन्नात पसरू शकतात. यामुळे अन्न विषबाधेचा धोका वाढतो. त्यामुळे कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा.
हात न धुता स्वयंपाक करणे: बाहेरून आल्यावर हात न धुताच स्वयंपाकाला सुरुवात करणे ही सर्वांत सामान्य पण धोकादायक चूक आहे. यामुळे घाण आणि जीवाणू थेट अन्नात जातात. स्वयंपाकाचे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी किमान वीस सेकंद साबणाने हात धुणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
स्वच्छतेची सवय हेच आरोग्याचे रक्षण
या छोट्या सवयी अंगीकारल्या तर स्वयंपाकघर स्वच्छ राहते आणि कुटुंबाचे आरोग्यही सुरक्षित राहते. किचनची काळजी म्हणजेच आरोग्याची काळजी, हे लक्षात ठेवून या चुका टाळणे हाच योग्य मार्ग आहे.
Leave a Reply