बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाच्या यशामागे काम करणाऱ्या एका कलाकाराची व्यथा आता समोर आली आहे. या चित्रपटाच्या दृश्य परिणामांसाठी (व्हीएफएक्स) काम करणाऱ्या राहुल धनवे यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ने आतापर्यंत १७०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. मात्र, या यशात हातभार लावणाऱ्या कलाकारांना योग्य वागणूक मिळाली नाही, असा आरोप राहुल यांनी केला आहे.
साडेचार वर्षे काम, पगारवाढ नाही
राहुल धनवे हे एन्व्हायर्नमेंटल मॉडेलिंग आर्टिस्ट आहेत. चित्रपटातील डोंगर, नद्या आणि जंगलं यांसारखी दृश्यं तयार करणं हे त्यांचं काम आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून ते निर्माते नमित मल्होत्रा यांच्या डीएनईजी या कंपनीसोबत काम करत होते. यातील दोन वर्षे त्यांनी ‘रामायण’ प्रकल्पावर घालवली. याशिवाय त्यांनी ‘टॉक्सिक’, ‘फाइटर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांसाठीही काम केलं आहे.
मात्र, या संपूर्ण काळात आपल्याला एक रुपयाचीही पगारवाढ मिळाली नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे. ग्रॅच्युटीचा काळ जवळ येताच कंपनीने आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवला, असा त्यांचा आरोप आहे.
‘रामायण पार्ट २’च्या कलाकारांबाबत चिंता
एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट लिहून राहुल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘रामायण’साठी आपण दोन वर्षे मनापासून मेहनत केली आणि खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला, असं त्यांनी म्हटलं आहे. चित्रपट यशस्वी झाला तरी त्यातून आपल्याला कोणताही हिस्सा मिळणार नाही, याची आपल्याला कल्पना होती, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
कंपनीचा उद्देश व्यवसाय करणं असतो, हे आपल्याला समजतं. पण कलाकारांना वापरून फेकून देण्यासारखी वागणूक द्यावी का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे. डीएनईजी हा आपल्या कारकिर्दीतील सर्वांत वाईट स्टुडिओ अनुभव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल यांनी ‘रामायण पार्ट २’वर काम करणाऱ्या कलाकारांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. इतर कलाकारांना अशी परिस्थिती भोगावी लागू नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच, डीएनईजीमध्ये नोकरी स्वीकारण्यापूर्वी कलाकारांनी नीट विचार करावा आणि दुसरी चांगली संधी असेल तर तिला प्राधान्य द्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दरम्यान, आपल्या पोस्टवरील टिप्पणीत राहुल यांनी नंतर आपल्याला ग्रॅच्युटी मिळाल्याचं सांगितलं आहे.
Leave a Reply