भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने १५ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ते ८ डिसेंबरदरम्यान या विशेष गाड्या धावणार असून त्यात नागपूर-मुंबई मार्गावर आठ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
नागपूरहून मुंबईला चार विशेष गाड्या
नागपूरहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ४ डिसेंबरला नागपूरहून सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५५ वाजता मुंबईला पोहोचेल. याच दिवशी रात्री ११.५५ वाजता सुटणारी दुसरी गाडी ५ डिसेंबरला दुपारी ४.१५ वाजता पोहोचेल. ५ डिसेंबरला सकाळी ७.४० वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मुंबईला पोहोचेल, तर सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी गाडी ६ डिसेंबरला सकाळी १०.५५ वाजता पोहोचेल.
मुंबईहून नागपूरला चार विशेष गाड्या
मुंबईहून नागपूरसाठीही चार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ डिसेंबरला रात्री ८.२५ वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२० वाजता नागपूरला पोहोचेल. ७ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.५५ वाजता, तर त्याच दिवशी दुपारी १२.३५ वाजता सुटणारी गाडी ८ डिसेंबरला पहाटे ३ वाजता नागपूरला पोहोचेल. ८ डिसेंबरला मध्यरात्री १२.२५ वाजता सुटणारी गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल. याशिवाय ७ डिसेंबरला मध्यरात्री १२.४० वाजता दादरहून सुटणारी विशेष गाडी त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे आणि तिकीट व्यवस्था
नागपूर-मुंबई मार्गावरील या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळंब, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे देण्यात आले आहेत. अनारक्षित डब्यांचे तिकीट सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तसेच रेलवन ॲपवरून काढता येणार आहे.
Leave a Reply