सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर, प्रिपेड मीटर आणि वीज बिलांसंदर्भात केलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कुडाळ येथील अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून संबंधित तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित तक्रारदारांना देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत.
अनेक तक्रारी अधीक्षक अभियंत्यांकडे
जिल्हाधिकारी कार्यालयाला शासन, विविध व्यक्ती, लोकप्रतिनिधी, संस्था आणि संघटनांकडून स्मार्ट मीटर, प्रिपेड मीटर तसेच वीज बिलांबाबत अनेक निवेदने आणि तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. हे विषय महावितरणच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित तक्रारी अधीक्षक अभियंत्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसविण्याबाबत गणपत सोमा परब, विजय दांड, किशोर विजय दांड, विजय भिकाजी लाड आणि सदाशिव लक्ष्मण राऊळ या पाच ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत ग्राहकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेण्याची मागणी या तक्रारींमधून करण्यात आली आहे. याशिवाय मदन रामचंद्र कुंदेकर यांनी थ्री-फेज वीजपुरवठा, चुकीचे वीजबिल, परतावा आणि नुकसानभरपाईबाबत तक्रार केली आहे. मधुकर हरी नलावडे यांनी घर बंद असतानाही वीज वापर नसताना चुकीचे युनिट आकारून बिल दिल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. प्रिया मधुकर नलावडे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आणि ग्राहकाच्या अनुपस्थितीत जुना मीटर काढून स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याबाबत तक्रार केली आहे, तर कृष्णा नारायण परब यांनी घरासमोरून जाणाऱ्या नवीन विद्युत वाहिनीच्या संख्येत आवश्यक बदल करण्याची मागणी केली आहे.
वीज परिषदेस अधिकारी उपस्थित राहण्याची मागणी
वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भिकाजी लाड यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय वीज परिषदेस महावितरणच्या सिंधुदुर्ग मंडळातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ग्राहकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली होती. यासंदर्भातील निवेदनाचाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेतल्याबद्दल संजय लाड यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले येणे, पूर्वसूचना न देता जुने मीटर बदलणे, घर बंद असतानाही वीज वापराचे बिल आकारणे आणि चुकीच्या बिलांमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणे, अशा तक्रारी जिल्ह्यातून सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महावितरणने सर्व तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांचे समाधान करावे, अशी अपेक्षा वीज ग्राहक संघटनेने व्यक्त केली आहे.
Leave a Reply