तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील जहिराबाद बायपासवर हैदराबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार अपघातात मुरूम येथील शरणाप्पा सिद्रामप्पा मुदकण्णा (६१) आणि त्यांच्या पत्नी सुषमा मुदकण्णा यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुरूम शहरात समजताच सर्वत्र शोककळा पसरली असून शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.
शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील योगदान
शरणाप्पा मुदकण्णा हे परिसरात ‘शरणु अण्णा’ म्हणून परिचित होते. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या मुदकण्णा यांनी मुरूमच्या शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शांतीनिकेतन विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शैक्षणिक शिस्त आणि नियोजनाला प्राधान्य मिळावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदानही उल्लेखनीय होते. श्री महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित, मुरूमच्या स्थापनेपासून ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या १८ वर्षांपासून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेला सातत्याने ‘अ’ वर्ग लेखापरीक्षण दर्जा मिळाला, तसेच सहा वेळा विभागीय पुरस्कार प्राप्त झाले. समाजात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय सुरू केले.
अंत्यसंस्कार बुधवारी सकाळी
मुदकण्णा दाम्पत्याच्या अकाली निधनाने मुरूमच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, दोन बहिणी, मुलगी तेजस्विनी (आयटी अभियंता) आणि मुलगा वीरकुमार (नेपाळ येथे एमबीबीएसचे शिक्षण) असा परिवार आहे. माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा यांचे ते लहान बंधू होत. मुदकण्णा दाम्पत्यावर बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुरूम येथील कंटेकुर रस्त्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Leave a Reply