उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची तयारी करत आहे. लवकरच हे ऑपरेशन केले जाईल, मात्र त्याची तारीख आणि वेळ आता सांगू शकत नाही, असे मोठे वक्तव्य शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. ‘आगे आगे देखो होता है क्या’, अशा स्वरूपाचे सूचक विधान शिवसेना नेत्यांकडून याआधीही करण्यात आले आहे. आता तळकोकणातील एक बडा नेता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नगराध्यक्षांसाठी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिला आहे.
या बैठकीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपस्थित होते. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
नारायण राणे यांचे सूचक वक्तव्य
चार दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे यांनी पारकर यांचे कौतुक करत ते आता आमच्याबरोबरच आहेत, पण अंडरग्राउंड आहेत, असे मिश्कील विधान केले होते. त्यामुळे लवकरच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. पारकर यांच्या निर्णयाला महायुतीतील भाजप खासदार नारायण राणे यांच्यासारख्या बड्या नेत्यांची अनुकूलता असल्याने लवकरच मोठा निर्णय होईल, अशी चर्चा आहे.
निवडणुकीवेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडी
संदेश पारकर हे कणकवली शहर विकास आघाडीकडून निवडणूक लढून नगराध्यक्षपदी निवडून आले होते. त्यावेळी बदलत्या तात्कालिक राजकीय समीकरणात शिवसेना-भाजप यांच्यात थेट आमने-सामने लढत झाली होती. मात्र निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यातील वितुष्ट संपले. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे युवानेते, कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी पारकर यांना उघडपणे मदत केली होती. त्यांनी पारकर यांच्यासाठी जाहीर सभांनाही उपस्थित राहून त्यांनाच जाहीरपणे पाठिंबा दिला होता.
निवडणुकीतील या समीकरणांमुळेच पारकर यांचा विजय सोपा झाला होता. कणकवली शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला कोणता तरी मोठा निर्णय भविष्यात घ्यावा लागेल, असे मोठे सूचक विधान पारकर यांनी अनेकवेळा माध्यमांजवळ बोलताना केले आहे. मात्र ते हा निर्णय कधी घेणार, ते कोणत्या पक्षात जाणार, याबद्दलची उत्सुकता कायम आहे.
२३ नोव्हेंबर रोजी, सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षांची बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने बळकटीसाठी आणि संवाद साधण्यासाठी बोलावली होती. महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्षांसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला थेट संदेश पारकर यांची उपस्थिती अधोरेखित झाली आहे. मात्र संदेश पारकर बैठक संपताच कोणालाही न कळता या बैठकीतून निघून गेल्याची माहिती आहे. शिवसेना नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलेल्या फोटोमध्येही संदेश पारकर दिसत असल्याने चर्चेला बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याशी थेट संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
Leave a Reply