दातांवर कॅप, ब्रिज किंवा कृत्रिम दात बसवले असतील, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. दातावर बसवलेली कॅप सुरक्षित धातूची नसून भंगारातील धातू वितळवून तयार केलेली असू शकते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडे या संदर्भात ३५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील ५० हून अधिक तक्रारी एकट्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित नसून राज्यभर पसरलेला असल्याचे दिसते.
पाच रुपयांची नाणी वितळवून धातू
दातांच्या कॅप तयार करण्यासाठी पाच रुपयांच्या नाण्यांसह इतर चलनी नाणी वितळवून त्यातील धातू वापरला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच, निकृष्ट दर्जाचा भंगारातील धातू वितळवून त्यापासून कॅप बनवल्या जात असल्याचेही तक्रारींमध्ये म्हटले आहे. अशा धातूपासून बनवलेली कॅप तोंडात बसवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
नागरिकांना आवाहन
या धक्कादायक प्रकारानंतर महाराष्ट्र दंत तंत्रज्ञ संघटनेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. दातांची कॅप किंवा कृत्रिम दात बसवताना नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अधिकृत व विश्वासार्ह ठिकाणांचाच वापर करावा, असे संघटनेने सांगितले आहे. तक्रारींची संख्या पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply