देशातील सर्वांत मोठी पाणी कंपनी बिस्लेरीवर अन्न सुरक्षा नियामक संस्थेने मोठी कारवाई केली आहे. बिस्लेरीच्या पाण्याचे नमुने सलग दोनदा गुणवत्ता चाचणीत नापास झाल्यानंतर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं चाचण्यांतून समोर आलं आहे.
दोन्ही चाचण्यांत काय आढळलं?
पहिल्या चाचणीत पाण्यात ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळली. ब्रोमेट आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. कंपनीने यावर आक्षेप घेतला, त्यानंतर दुसरी चाचणी घेण्यात आली. दुसऱ्या चाचणीतही पाणी असुरक्षित आढळलं; यावेळी पाण्यात पीएएचज् (PAHs) नावाचे कर्करोगास कारणीभूत घटक आढळले. ब्रोमेट आणि पीएएचज् दोन्ही कर्करोगास कारणीभूत पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जातात. विशेष म्हणजे पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातूनच गोळा करण्यात आले होते. कंपनीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इतर कंपन्यांवरही कारवाई
ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत केली जाणार आहे. ५० वर्षांहून अधिक जुन्या या ब्रँडवर झालेल्या कारवाईने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. नियामक संस्थेने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी यांसारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही उत्पादनं परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचं पालन न केल्यामुळे उर्मी लाइफसायन्सेस आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर्स यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आशा कन्फेक्शनरीला पॅकबंद चॉकलेट भरलेली बिस्किटं असुरक्षित आढळल्यानंतर ती परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Leave a Reply