उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषांगाने घडामोडींना वेग आला आहे. समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला २६ जागांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षासमोर १३० जागांची यादी सादर केली होती. यातील २६ जागा काँग्रेसला देण्यास समाजवादी पक्षाने मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित जागांबाबत समाजवादी पक्षाने काँग्रेसला आधी त्यांच्या उमेदवारांची नावे देण्यास सांगितले आहे. त्यानंतरच आणखी किती जागा द्यायच्या आणि त्या नेमक्या कोणत्या असतील, हे ठरवले जाणार आहे.
२६ जागांची यादी कशी?
समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आणि राजीव राय यांनी या २६ जागांची माहिती माध्यमांना दिली असून, त्यांची एक यादीही समोर आली आहे. या २६ पैकी एकाही जागेवर सध्या समाजवादी पक्षाचा आमदार नाही. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसने यातील दोन जागा जिंकल्या होत्या, तर चार जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. २०२२ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या जागांमध्ये रामपूर खास आणि फरेन्दा यांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांमध्ये मथुरा, खेरागड, जगदीशपूर आणि किदवाई नगर आहेत. उर्वरित २० जागांमध्ये बागपत, मोदीनगर, हापूर, जेवार, सायना, खुर्जा, खैर-इग्लास, मंट, आग्रा, फतेहपूर उत्तर, सिक्री, बिलग्राम-मल्लावन, गोविंद नगर, नानपरा, गोरखपूर शहर, खजनी, पडरौना, फाजीलनगर, पिंद्रा आणि वाराणसी कँट यांचा समावेश आहे. मात्र, या यादीतून अमेठी आणि रायबरेली यांसारखे काँग्रेसचे बालेकिल्ले वगळण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची नाराजी आणि दोन्ही पक्षांच्या प्रतिक्रिया
या २६ जागांबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असून, पक्षाने अद्याप त्यांना संमती दिलेली नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम आणि इम्रान मसूद यांनी २६ जागांच्या यादीबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद म्हणाले की, जागांची मागणी करणे आणि सहकार्य करणे यात फरक असतो. युतीमध्ये कशाचीही मागणी करण्याची गरज नसते; सर्व काही परस्पर सहकार्यातून साध्य केले जाते. आम्ही एकत्र बसून चर्चा करू आणि आमच्या वाट्याला येणाऱ्या जागा निश्चित करू, असे मसूद म्हणाले. दुसरीकडे समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय म्हणाले की, त्यांना २६ जागा देण्यात आल्या आहेत आणि अजून काही जागा देण्यासाठी चर्चा केली जाईल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने ८० पैकी ४३ जागांवर विजय मिळवला होता. याच कामगिरीच्या आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने १३० जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, समाजवादी पक्ष जागावाटपासाठी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील स्वतःच्या कामगिरीला आधार मानत आहे. केवळ निवडणुकीत विजयाची खात्री असेल, तरच काँग्रेसला जागा देण्याबाबत समाजवादी पक्ष सकारात्मक असल्याचे म्हटले जात आहे. जागावाटपाची ही चर्चा आता कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply