भारताचे प्रतिनिधित्व करणारी १९ वर्षीय काजिया लिझ मेजो मिस युनिव्हर्स २०२६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. केरळची ही तरुणी आता विश्वसुंदरीच्या किताबापासून अवघ्या एका पावलावर आहे. अंतिम सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असून, काजिया हा ऐतिहासिक किताब जिंकणार का, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
११६ देशांतील स्पर्धकांमध्ये चुरस
यंदा मिस युनिव्हर्स स्पर्धेचे ७५ वे वर्ष आहे. जगभरातील ११६ देश आणि प्रदेशांतील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. काजियासमोर ११५ स्पर्धकांचे आव्हान आहे. अंतिम फेरी २४ नोव्हेंबर रोजी पोर्तो रिकोमधील सॅन हुआन येथे पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता अंतिम सोहळा सुरू होईल. यंदाच्या विजेतीला ३,००० हून अधिक हिरे जडवलेला खास मुकुट मिळणार आहे.
केरळची पहिली मिस युनिव्हर्स इंडिया
२३ ऑगस्ट २०२६ रोजी जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत काजियाने विजेतेपद मिळवले होते. केरळमधून हा किताब जिंकणारी ती पहिली महिला ठरली आहे. तिचा जन्म संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाला असून तिचे मूळ गाव केरळमध्ये आहे. काजिया सध्या बंगळुरूमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. मॉडेलिंगसोबतच तिला अभिनय, शास्त्रीय नृत्य आणि संगीताची आवड आहे. ती व्हायोलिन आणि ड्रम्सही वाजवते. अंतिम फेरीत तिची कामगिरी कशी होते, यावर आता सर्वांचे लक्ष आहे.
Leave a Reply