आजकाल अनेकांना केस गळण्याची समस्या भेडसावते आहे. खराब आहार, मानसिक ताण आणि बदललेली जीवनशैली यांमुळे केस गळतात, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. मात्र, शरीरातील काही तक्रारींकडे लोकांचं लक्ष जात नाही आणि त्याचाच परिणाम केसांवर होतो. त्यामुळे केसांची काळजी घेताना पोटाच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
## पोटाचं आरोग्य आणि केसांचं नातं
आतड्यांमध्ये सूज येणं, आतड्यांचं आतील आवरण कमकुवत होणं किंवा आतड्यांतील उपयुक्त जिवाणूंचं प्रमाण बिघडणं यामुळे अन्नातील पोषक घटक शरीरात नीट शोषले जात नाहीत. यातून शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. लोहाची कमतरता हे केस गळण्याचं एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं.
## आहारात काय घ्यावं?
लोहाबरोबरच झिंक, बायोटिन आणि व्हिटॅमिन डी यांची कमतरताही केसगळती वाढवू शकते. त्यामुळे दररोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि ताज्या भाज्यांचा समावेश करावा. नट्स आणि बिया खाल्ल्यानं झिंक मिळण्यास मदत होते. व्हिटॅमिन डीसाठी दररोज साधारण 20 मिनिटं उन्हात बसण्याचा सल्ला दिला जातो. संतुलित आहारातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, त्यामुळे आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
आतडे आणि मोठ्या आतड्याच्या आरोग्यासाठी आहारात त्रिफळा पावडर घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. महागडे शॅम्पू आणि केसांची निगा करणारी उत्पादनं वापरण्यासोबतच शरीराच्या आतल्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं. केसगळती खूप जास्त असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Leave a Reply