महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन सहसचिव आणि उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली आदेशात अंशतः बदल करण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश जारी करण्यात आला असून, दोन अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमध्ये बदल झाला आहे.
उपसचिव प्रसाद रामचंद्र शिंदे यांची प्रशासकीय कारणास्तव आंतरविभागीय बदली करण्यात आली आहे. त्यांची राजशिष्टाचार विभागातून शालेय शिक्षण विभागात पदस्थापना करण्यात आली आहे.
उपसचिव विजय निवृत्ती भोसले यांची सुधारित तात्पुरती पदस्थापना आता सार्वजनिक बांधकाम विभागात करण्यात आली आहे. याआधी विजय निवृत्ती भोसले, उपसचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांची नगरविकास विभागात बदलीने पदस्थापना करण्यात आली होती.
न्यायालयीन पार्श्वभूमी आणि तात्पुरती पदस्थापना
या बदली आदेशाला न्यायालयीन प्रक्रियेची पार्श्वभूमी निर्माण झाली होती. नगरविकास विभागातील सहसचिव सुब्बराव शिंदे यांनी त्यांच्या बदलीच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक ८७३/२०२६ दाखल केला आहे. या प्रकरणात न्यायाधिकरणाने जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, नगरविकास विभागात उपसचिव संवर्गातील पद रिक्त नसल्यामुळे विजय भोसले हे अद्याप पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे शासनाने त्यांच्या बदलीनंतरच्या पदस्थापनेत अंशतः बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातील मूळ अर्ज क्रमांक ८७३/२०२६ मधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून विजय निवृत्ती भोसले यांची सार्वजनिक बांधकाम विभागात सुधारित तात्पुरती पदस्थापना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विजय भोसले यांच्या पदस्थापनेचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मार्गी लागला आहे.
Leave a Reply