आज २४ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त देव दिवाळी साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी मंदिरांमध्ये आणि नदीच्या घाटांवर दिव्यांची रोषणाई केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सर्व देवी-देवता पृथ्वीवर येऊन दिवाळी साजरी करतात. त्यामुळेच या सणाला देवतांची दिवाळी असेही म्हटले जाते.
देवतांची दिवाळी का म्हणतात?
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराच्या अत्याचारांमुळे तिन्ही लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा वध करून भगवान शिव यांनी सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. भगवान शिव यांच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व देवी-देवता स्वर्गातून काशीमध्ये आले होते. त्यांनी काशीतील गंगा घाटांवर असंख्य दिवे प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा केला आणि महादेवाची विशेष आरती केली. तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे.
दीपदानाचा शुभ मुहूर्त
यंदा देव दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात दीपदान करणे शुभ मानले जाते. दीपदानाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटे ते रात्री ७ वाजून ४७ मिनिटे असा असून त्याचा एकूण कालावधी २ तास ३९ मिनिटे आहे. कार्तिक पौर्णिमा तिथी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४२ मिनिटांनी सुरू झाली असून ती २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देव दिवाळीच्या संध्याकाळी ११, २१, ५१ किंवा १०८ दिवे लावणे शुभ मानले जाते. मात्र, एवढे दिवे लावणे शक्य नसेल, तर श्रद्धेनुसार ५ किंवा ७ दिवेही लावू शकता. दीपदानासाठी स्वच्छ मातीचे किंवा पिठाचे दिवे घ्यावेत आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तीळ तेल वापरावे. घराचे मुख्य प्रवेशद्वार, देवघर आणि अंगणातील तुळशीजवळ दिवे लावावेत. शक्य असल्यास पवित्र नदी, तलाव किंवा जवळच्या मंदिरात जाऊनही दिवे लावावेत. दिवे प्रज्वलित करताना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे मनोभावे स्मरण करावे आणि कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी प्रार्थना करावी.
Leave a Reply