शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांमध्ये राजकारण आणले जाऊ नये, अशी स्पष्ट भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे. सध्या राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अशा वेळी लोकांच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात पुढील तीन वर्षे अधिवेशन होणार नसल्याने तेथील प्रश्न आणखी गंभीर बनले आहेत, असेही पवार म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांसारख्या नेत्यांनी आधीच घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे
आगामी आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांवरच आधारित असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. या आंदोलनात कोणत्याही पक्षाचे चिन्ह वापरण्यात येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे नाही
काँग्रेसने या आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत करताना पवार म्हणाले की, हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाचे नाही. शेतकरी, शेतमजूर आणि बचत गटातील महिलांचे हे आंदोलन आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply