हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेला एक विवाह देशभर चर्चेचा विषय ठरला होता. सिरमौर जिल्ह्यातील सिलाई गावात एका तरुणीने दोन सख्ख्या भावांशी लग्न केले होते. आता हे दोन भाऊ आणि त्यांची पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच एका प्रसिद्ध महिला यूट्यूबरला मुलाखत दिली आणि या त्रिकोणी विवाहाबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. प्रदीप, कपिल आणि त्यांची पत्नी सुनीता यांनी सांगितले की, त्यांनी परस्पर संमतीने हा विवाह केला असून त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता.
सोशल मीडियावर जवळपास ५० लाख फॉलोअर्स असलेल्या यूट्यूबर निशू तिवारी यांनी सिलाई गावाला भेट देऊन तिघांची मुलाखत घेतली. प्रदीपचे वय ३५ वर्षे असून कपिल २८ वर्षांचा आहे. प्रदीपने सांगितले की, त्याचेच सुनीताशी लग्न झाले असून त्यानेच लग्नाचे विधी पूर्ण केले होते.
विवाहाची ही निवड का?
या व्यवस्थेची निवड का केली, यावर प्रदीपने स्पष्ट केले की, त्यांच्याकडे हाच एकमेव पर्याय होता. भावा-भावांमधील नाते हेच सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. दोन स्वतंत्र विवाह झाले असते तर दोन वेगळी कुटुंबे तयार झाली असती. दोघेही कमावते असल्याने मिळकतीतून खर्च भागवून बचतही करता येते, असे त्याने सांगितले. त्याने असेही म्हटले की, त्याच्यासाठी भाऊ हा पत्नीपेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे.
सुनीताला विचारले असता तिने सांगितले की, तिला सर्व काही माहीत होते आणि तिने स्वतःच्या इच्छेने या विवाहबंधनात प्रवेश केला. इथे अशा प्रकारचा विवाह पहिल्यांदाच होत नाही, भूतकाळातही असे विवाह झाले आहेत, असे तिने सांगितले. हा प्रेमविवाह होता, असेही तिने स्पष्ट केले. एकाच वेळी दोन व्यक्तींच्या प्रेमात पडणे शक्य असल्याचे तिचे म्हणणे आहे.
मुलीच्या नावापुढे कोणाचे नाव?
सुनीताला एक मुलगी आहे. मुलीच्या नावापुढे वडिलांच्या जागी कोणाचे नाव लावायचे, या प्रश्नावर सुनीताने स्पष्ट केले की, मुलीच्या नावापुढे मोठ्या भावाचे नाव असेल. नंतर असे वाटले की मुलीच्या नावापुढे लहान भावाचे नाव असावे, तर तसे करता येईल, असेही तिने सांगितले.
एकत्र कुटुंबपद्धती टिकवण्यासाठी आणि मालमत्तेचे विभाजन टाळण्यासाठी सिरमौर जिल्ह्यात ‘जोडीदार’ ही बहुपतित्वाची प्रथा परंपरेने चालत आली आहे. तेथील स्थानिक परंपरा आणि रीतीरिवाज वेगळे असून संयुक्त कुटुंब आणि मालमत्तेचे विभाजन रोखण्यासाठी आजही ही परंपरा पाळली जाते.
Leave a Reply