कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात नारळी-पोफळीच्या बागा, हिरवंगार डोंगर, लाल मातीचे रस्ते आणि अथांग समुद्र. गणपतीपुळे, तारकर्ली, दिवेआगर आणि हरिहरेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र कोकणात अशी काही गावं आहेत, जी अजूनही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहेत. असंच एक निसर्गरम्य गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी.
कनकादित्य सूर्य मंदिर हे मुख्य आकर्षण
कशेळी गावाचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथलं प्राचीन कनकादित्य सूर्य मंदिर. महाराष्ट्रातील मोजक्या सूर्य मंदिरांपैकी हे एक महत्त्वाचं मंदिर मानलं जातं. या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. सूर्यदेवाला समर्पित असलेल्या या मंदिरातील मूर्ती आणि मंदिराची रचना पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. मंदिराशी संबंधित ऐतिहासिक संदर्भ आणि स्थानिक आख्यायिका यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. हे मंदिर ८०० वर्षांहून जुनं असल्याचं सांगितलं जातं.
देवघळी बीच आणि देवाची खोली गुहा
कशेळीला गेल्यानंतर देवघळी बीचला भेट दिल्याशिवाय सहल पूर्ण होणार नाही. निळाशार समुद्र, उंच कातळ, समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आजूबाजूचा शांत परिसर मनाला प्रसन्न करतो. इथून दिसणारं समुद्राचं विहंगम दृश्य पर्यटकांना आकर्षित करतं. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी समुद्रावर पसरणारी केशरी-पिवळी छटा पाहण्यासारखी असते. इतर प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे इथे फारशी गर्दी नसल्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो.
कशेळीच्या पर्यटनाला आणखी एक वेगळा पैलू जोडला आहे तो म्हणजे इथली देवाची खोली गुहा. स्थानिक आख्यायिकेनुसार, गुजरातमधून आणलेली सूर्यदेवाची मूर्ती समुद्रकिनाऱ्याजवळील गुहेत ठेवण्यात आली होती. पुढे याच मूर्तीची कनकादित्य मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली, अशी कथा सांगितली जाते.
कसं जायचं आणि केव्हा जायचं
कशेळीपासून जवळच आदिवरे इथं प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. त्यामुळे कशेळी सहलीसोबत या मंदिरालाही भेट देता येते. धार्मिक पर्यटनासोबतच कोकणातील गावांचं सौंदर्य अनुभवण्याची संधी यामुळे मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी हे गाव आहे. रत्नागिरी आणि राजापूर इथून रस्तेमार्गे कशेळीला पोहोचता येतं. स्वतःची गाडी किंवा स्थानिक वाहतुकीचा पर्याय निवडता येईल. ऑक्टोबर ते मार्च हा काळ इथं फिरण्यासाठी चांगला मानला जातो. एकूणच, कोकणातील निसर्ग, इतिहास, धार्मिक स्थळं आणि शांत समुद्रकिनारा यांचा अनुभव एकाच सहलीत घ्यायचा असेल, तर कशेळी नक्कीच प्रवासाच्या यादीत असायला हवं.
Leave a Reply