संध्याकाळ झाली की मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि अनेक मालिकांना प्रेक्षक भरभरून प्रेम देतात. पण आवडती मालिका निरोप घेणार असल्याचं कळलं, की चाहत्यांना मोठा धक्का बसतो. सध्या अशाच चर्चेला तोंड फुटलं आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून ‘येतेच मी नांदायला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती रात्री १० वाजता प्रसारित होईल. त्यामुळे या नव्या मालिकेसाठी ‘देवमाणूस’ आणि ‘तुला जपणार आहे…’ यापैकी कोणती मालिका निरोप घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
‘देवमाणूस’ बंद होणार नाही, वेळ बदलणार
नव्या मालिकेमुळे ‘देवमाणूस’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा जोर धरू लागली होती. पण तसं काहीही होणार नाही. ‘देवमाणूस’ ही मालिका बंद होणार नसून ती रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे त्या मालिकेच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
‘तुला जपणार आहे’चा निरोप?
‘तुला जपणार आहे’ ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित व्हायची. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. मालिका बंद होणार असल्याची चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महिमा हिने या मालिकेत मीरा ही भूमिका साकारली आहे. तिने हृदयाचं आणि डोळे पाणावल्याचं चिन्ह असलेली पोस्ट शेअर केली असून, ‘आज काहीतरी वेगळं वाटत आहे..’ असं कॅप्शन लिहिलं आहे. तिचं हे कॅप्शन पाहिल्यानंतर प्रेक्षकही नाराज झाल्याचं दिसत आहे.
‘तुला जपणार आहे’ मालिकेचा शेवटचा भाग २७ नोव्हेंबर रोजी प्रसारित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. नव्या ‘येतेच मी नांदायला’ मालिकेत अभिनेत्री पूजा बाबरी आणि हर्षद अतकरी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची आणि नव्या मालिकेची चर्चा रंगली आहे.
Leave a Reply