बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अभिनेत्री होण्यापूर्वी तिला अभिनयाचे धडे गिरवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI 2026) मधील एका चर्चासत्रात याबाबतचा एक रंजक किस्सा सांगितला.
दीपिका खेर यांच्या एक्टिंग स्कूलची विद्यार्थिनी
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली होती. फराह खानने तिला शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मात्र, त्याआधी दीपिकाने अभिनयाचं प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईतील अनुपम खेर यांच्या ‘एक्टर प्रिपेअर्स’ या एक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तिथे तिने तीन महिन्यांचा अभिनयाचा कोर्स पूर्ण केला. अनुपम खेर यांच्या म्हणण्यानुसार, दीपिका त्यांच्या एक्टिंग स्कूलच्या दुसऱ्या बॅचची विद्यार्थिनी होती. ती त्यावेळी प्रसिद्ध मॉडेल होती आणि तिचं व्यक्तिमत्त्व अतिशय शिस्तबद्ध होतं.
झाडू मारण्याचा सीन आणि डोळ्यांत आलेले अश्रू
एकदा अनुपम खेर यांनी दीपिकाला घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारण्यास सांगितले. या भूमिकेत तिला फक्त जमिनीवर झाडू मारायचा होता. मात्र, दीपिका हा सीनही तिच्या नेहमीच्या आकर्षक अंदाजात करत होती, त्यामुळे अभिनयात हवा तसा नैसर्गिकपणा दिसत नव्हता. त्यानंतर अनुपम यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला वर्गात बोलावले आणि तिला झाडू मारून दाखवण्यास सांगितले. त्या महिलेने अतिशय सहजपणे झाडू मारला. त्यानंतर जोपर्यंत तिचा अभिनय खरा वाटत नाही, तोपर्यंत हा सराव सुरू ठेवावा लागेल, असे अनुपम यांनी दीपिकाला सांगितले. हा सराव करताना दीपिका सुरुवातीला खूप वैतागली होती, तिला जवळपास रडूच कोसळणार होते. मात्र, तिने हार मानली नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर तो सीन योग्य पद्धतीने साकारला. सराव पूर्ण झाल्यानंतर दीपिकाने अनुपम खेर यांचे आभारही मानले.
Leave a Reply