वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवते म्हणून तिला भाजपची बी-टीम ठरवले जाते. मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, तरी त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर करून वंचितला बी-टीम म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अंजली आंबेडकर यांनी म्हटले आहे की, वंचित प्रस्थापित पक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत नाही किंवा त्यांच्या पंखाखाली जात नाही, म्हणून तिला बी-टीम ठरवले जाते. वंचित स्वतःचे राजकारण उभे करू पाहते. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला राजकीय मदत करतात, तेव्हा त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचे आवाज बंद होतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
डिलिमिटेशन विधेयकावर आक्षेप
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर टीका करणारे खुले पत्र किती स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी लिहिले, असा सवालही अंजली आंबेडकर यांनी विचारला आहे. त्यांच्या मते, हे डिलिमिटेशन विधेयक एसआयआरपेक्षाही अधिक धोकादायक आहे. या विधेयकामुळे उत्तर भारतातील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व असमान प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या संघराज्यीय समतोलाला धक्का बसू शकतो, एका विशिष्ट प्रादेशिक गटाच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होऊ शकते आणि समान प्रतिनिधित्वाच्या लोकशाही तत्त्वाला बाधा पोहोचू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
२०२४ च्या निवडणुकीत प्रबळ जातींच्या राजकीय पक्षांसाठी उच्चवर्णीय स्त्रीवादी, पुरोगामी आणि ‘निर्भय बनो’च्या लोकांनी जोरदार प्रचार केला, पण त्या पक्षांना प्रश्न विचारण्याची वेळ येते तेव्हा ते जाणीवपूर्वक गप्प बसतात, असा आरोप अंजली आंबेडकर यांनी केला आहे. हा बौद्धिक विसंगतीचा प्रश्न नसून राजकीय सोय आणि जातीवर आधारित ‘निवडक संताप’ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपच्या राजकीय अजेंड्याला मदत करतात आणि त्याला वैधता मिळवून देतात, तेव्हा त्यांना भाजपची बी-टीम का म्हटले जात नाही, असा त्यांचा सवाल आहे.
Leave a Reply