गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. नोव्हेंबर महिना संपता संपता ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर भारतात हवेचा दाब वाढला असून तेथून ईशान्येकडून थंड आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा खाली गेले आहे.
विदर्भातील आठ जिल्ह्यांत थंडी अधिक
विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी राज्याच्या काही भागांत थंडी जाणवली होती.
मुंबईत मात्र सौम्य गारवा
मुंबईत मात्र सध्या कडाक्याची थंडी नाही. तेथे तापमान सामान्य पातळीच्या आसपास असून सौम्य गारवा जाणवत आहे. शनिवारी मुंबईत किमान तापमान १६ अंश, रविवारी १७ अंश होते. सोमवारी सकाळी त्यात वाढ होऊन पारा २० अंशांवर पोहोचला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार सोमवारी सांताक्रूझ येथे २०.१ अंश, तर कुलाबा येथे २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.५ आणि ०.९ अंशांनी कमी होती.
सध्या महाराष्ट्रावर जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यावरील हवेचा दाब १०१४ हेक्टापास्कल असून उत्तर भारतात तो १०१६ हेक्टापास्कलपर्यंत वाढला आहे. हवेच्या दाबातील या फरकामुळे उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे ईशान्येकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहण्याची शक्यता आहे. त्यातून राज्यात थंडीचे संक्रमण अधिक प्रभावी होऊ शकते. ‘अक्वान’ चक्रीवादळाने दिशा बदलल्यामुळेही महाराष्ट्रातील थंडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Leave a Reply