देवगडच्या समुद्रात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकातील एक वेगवान ट्रॉलर मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून परवानगीशिवाय मासेमारी करणाऱ्या बाहेरच्या नौकांविरुद्ध विभागाने धडक मोहीम सुरूच ठेवली असून, याच मोहिमेचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
२२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतरच्या सुमारास ‘शीतल’ या गस्ती नौकेवरून पथक देवगड समुद्रात फिरत होते. त्यावेळी किनाऱ्यापासून सुमारे पाच ते सहा नॉटिकल मैल अंतरावर एक ट्रॉलर वैध परवान्याशिवाय जाळी टाकून मासेमारी करताना दिसली. गस्ती नौका पाहताच त्या ट्रॉलरने अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने धीर न सोडता आणि तांत्रिक कौशल्य वापरत पाठलाग सुरूच ठेवला. सुमारे तासभर चाललेल्या या पाठलागानंतर अखेर ट्रॉलर ताब्यात घेण्यात आली.
तासभर पाठलागानंतर ट्रॉलर ताब्यात
जप्त केलेली ट्रॉलर कर्नाटकातील मलपी येथील असून तिचे नाव ‘श्री अनघा’ आहे. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. देवगडचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. त्यांच्यासोबत सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्निल सावजी यांनी सहभाग घेतला.
राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांवर विभागाकडून सातत्याने कारवाई होत आहे. स्थानिक मच्छीमारांच्या हक्कांचे रक्षण आणि समुद्रातील साठ्याचे संवर्धन या दोन्ही दृष्टीने अशा गस्ती महत्त्वाच्या ठरत असल्याचे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Leave a Reply