मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुक्यात राँग साईड वाहनाची धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

कोरपना-आदिलाबाद महामार्गावर पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

धुक्यात राँग साईड वाहनाची धडक; दोन सुरक्षा रक्षकांचा मृत्यू

पहाटेच्या दाट धुक्यात कामावर जाणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कन्हाळगाव-चनई खुर्द फाट्यादरम्यान घडली आहे.

## कामावर जाताना काळाचा घाला

तिघेही आरसीसीपीएल लाईमस्टोन माईन्स, परसोडा येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. पहाटेच्या सुमारास तिघेही दुचाकीने (एमएच ३४ बीटी २१२०) कोरपना येथून कामावर जात होते. दरम्यान, परिसरात दाट धुके असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. अशातच विरुद्ध दिशेने राँग साईडने येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात प्रमोद भाऊराव किन्नाके (२६, रा. तुळशी, ता. कोरपना) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रणय मुके (२८, रा. निंबाळा, ता. वणी, जि. यवतमाळ) याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. वैभव रमेश राऊत (२५, रा. तांबाडी, ता. कोरपना) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर चंद्रपूर येथील मानवटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

## पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतक व जखमींना कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद रहागडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जमादार व कोरपना पोलिस करीत आहेत.

मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे धुके पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे वाहनधारकांना महामार्गावरून वाहने चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी वाहनचालकांनी सावधानता बाळगून वाहन चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance