टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या सभोवतालच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात पर्यटन विकासाच्या नावाखाली नियम मोडले जात असल्याचे समोर आले आहे. वनविभागाच्या चौकशी पथकाने केलेल्या स्थळपाहणीत तब्बल १७ पर्यटन प्रकल्पांमध्ये अनियमितता आढळून आली असून, त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आला आहे.
## १७ प्रकल्पांमध्ये अनियमितता
एका प्रकल्पाला दहा कॉटेज उभारण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात तिथे १५ कॉटेज उभारण्यात आल्याचे पाहणीत निदर्शनास आले. तसेच तात्पुरत्या निसर्ग पर्यटन सुविधांच्या नावाखाली पक्की बांधकामे करण्यात आल्याचेही आढळले आहे. जिल्हास्तरीय देखरेख समितीची पूर्वपरवानगी न घेता बांधकामे करण्यात आली आणि पर्यटन व्यवसाय सुरू करण्यात आला, असे पाहणीत स्पष्ट झाले.
टिपेश्वर परिसरातील अनधिकृत रिसॉर्ट बांधकामांविरोधात यवतमाळ जिल्हा ट्रायबल फोरमचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर १५ जून २०२६ रोजी सहायक वनसंरक्षक यांनी १७ पर्यटन आस्थापनांची पाहणी केली. वारंवार सूचनापत्रे देऊनही संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. १६ जूनला पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाईची शिफारसही करण्यात आली.
## मास्टर प्लॅन रखडला, कारवाईही कागदावरच?
१८ सप्टेंबर २०१८ रोजी इको सेन्सिटिव्ह झोनची अंतिम अधिसूचना जारी झाली होती. मात्र आठ वर्षांनंतरही झोनल मास्टर प्लॅन अंतिम झालेला नाही. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, सील किंवा दंडाबाबत ठोस माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रकल्पांवरील कारवाई आणि मास्टर प्लॅन याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिपेश्वरच्या जंगलात वाघ आणि अन्य वन्यजीवांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पर्यावरणीय संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळणे महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी वन्यजीवांच्या अधिवासाशी तडजोड करता येणार नाही. त्यामुळे टिपेश्वरमध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देताना पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी होणार की नियमभंग करणाऱ्या प्रकल्पांना अभय मिळणार, हा प्रश्न आता केंद्रस्थानी आला आहे.
Leave a Reply