शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जून 2022 मध्ये घडलेल्या घटनांबाबत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला जाऊ, असे सांगून आपल्याला गाडीत बसवले. मात्र, ठाण्याला न जाता गाडी सुरतकडे रवाना झाली, असा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे.
सुरतकडे जाताना काय घडले?
सुरतकडे जाताना एका टपरीवर गाडी थांबवण्यात आली होती. त्यानंतर एकामागून एक मंत्री तिथे येऊ लागले. सर्वप्रथम शंभूराज देसाई आणि त्यानंतर भुमरे तिथे आले. त्यावेळी आपल्याला संशय आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, कैलास पाटील बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने गाडीतून बाहेर पडले आणि तिथून निसटले, असेही नितीन देशमुख यांनी सांगितले. त्यानंतर गाडी पुढे सुरतकडे रवाना झाली. सुरतमध्ये पोहोचल्यानंतर संबंधित हॉटेलला सुमारे 500 पोलिसांचा घेरा असल्याचा दावा त्यांनी केला.
हॉटेलमध्ये काय घडल्याचा दावा?
हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर आपण तिथे थांबणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांना स्पष्ट सांगितले होते. जे काही बोलायचे आहे, ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू, अशी भूमिका आपण घेतली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपले ऐकले नाही, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्याला उद्देशून, ‘तू माझा खराबा करतोस, आण रे पिस्तूल, मी माझ्या डोक्यात गोळ्या घालतो,’ असे म्हटल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला. त्यावर ‘असं करू नका, माझ्या डोक्यात गोळी घाला,’ असे आपण उत्तर दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, सुरतमध्ये असताना आपल्याला औषध आणि इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आपण ते नाकारल्याचा दावाही नितीन देशमुख यांनी केला आहे. या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Leave a Reply