छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वाळूज परिसरात अपहरणाच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परिसरातील विटावा, कमळापूर आणि वडगाव कोल्हाटी या भागांतून एका तरुणीसह एका व्यक्तीला आणि एका अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तींनी पळवून नेलं आहे. या प्रकरणी तीन स्वतंत्र तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
वडगाव कोल्हाटीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण
वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरेनगर परिसरातून एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. सोनाली गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेलं. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकड करत आहेत.
कमळापूर आणि विटावा येथील घटना
कमळापूर येथील विठ्ठल वाटिका परिसरात राहणाऱ्या प्रमिला ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेलं. या प्रकरणी २० नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक १३८७ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस कर्मचारी पालवे करत आहेत. विटावा (ता. गंगापूर) येथील रिक्षाचालक फिराजी पिठले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीला अज्ञाताने पळवून नेलं. या प्रकरणी २० नोव्हेंबर रोजी गुन्हा क्रमांक १३८८ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी धाटबळे करत आहेत.
अवघ्या काही तासांच्या फरकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचे अशाप्रकारे अपहरण झाल्याने यामागे एखाद्या टोळीचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त होत आहे. सध्या पोलीस तिन्ही घटनांचा स्वतंत्र तपास करत आहेत.
Leave a Reply