जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या या वादाला आता राजकीय संघर्षाचं स्वरूप आलं आहे. किशोर आप्पा पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट आव्हान दिलं आहे.
किशोर पाटील यांचे आरोप काय?
मंगेश चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भूमिकेवर किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चव्हाण यांनी आधी त्यांची आमदारकी सांभाळावी, त्यांना आचारसंहितेचीही माहिती नाही, अशा शब्दांत पाटील यांनी पलटवार केला. जिल्हा बँकेची निवडणूक सोडा, स्वतःची आमदारकी वाचवता येते का, ते आधी पाहावं, असंही ते म्हणाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोपही पाटील यांनी केला. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून विधानसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्याकडे मंगेश चव्हाण यांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
चव्हाण यांचं उत्तर आणि पुढं काय?
जिल्ह्याचा बॉस समजणाऱ्या मंगेश चव्हाण यांच्या मांजरीच्या गळ्यात घंटा माझ्या मुलाने बांधली आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. यापुढे भाजपचे इतर आमदारही या विषयात पुढाकार घेतील, असं सूचक विधान त्यांनी केलं. मात्र हा वाद म्हणजे महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचा विषय नसल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, मंगेश चव्हाण यांनी एका गावातील टुकार मुलाची गोष्ट सांगत या टीकेला उत्तर दिलं. सुमित पाटील यांनी केलेल्या टीकेवर फार बोलणं उचित नाही, असंही चव्हाण म्हणाले. सत्ताधारी महायुतीतील दोन आमदारांमधील या आरोप-प्रत्यारोपांमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. चव्हाण या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात आणि मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
Leave a Reply