मुंबई हे स्वप्नांचे शहर मानले जाते. इथली जीवनशैली आणि इथली श्रीमंती अनेकांना भुरळ घालते. मात्र इथे राहणाऱ्या नोकरदार वर्गाच्या व्यथा वेगळ्याच आहेत. मुंबईमध्ये गगनाला भिडणारे घरांचे भाडे चांगल्या पगारदारांचेही बजेट बिघडवून टाकते. सध्या समाजमाध्यमावर ‘एट द मुव्हमेंट’चे सर्जनशील प्रमुख अंश जैन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी मुंबईत राहण्याचे दुःख मांडले आहे. ही पोस्ट मुंबईतल्या बहुतांश नोकरदार वर्गाच्या अनुभवाशी जुळणारी असल्याने ती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे.
भाडं न भरणाऱ्यांचा हेवा का वाटतो?
आपल्या पोस्टमध्ये अंश यांनी म्हटले आहे की, मुंबईत भाडे न देणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचा त्यांना हेवा वाटतो. अलीकडेच त्यांनी एका माजी सहकाऱ्याची समाजमाध्यमावरील स्टोरी पाहिली. ती दर सहा महिन्यांनी आग्नेय आशियाई देशात सुट्टीसाठी जाते. तिचे फोटो पाहून अंश यांना वाटले की तिच्याकडे किती पैसे आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नीने विचारले की ती भाडे देते का. उत्तर होते, नाही. यावर अंश यांनी हसत लिहिले की, ठीक आहे, हे चांगले आहे. आपल्याला कधीही भाडे द्यावे लागू नये, अशीच आपण प्रार्थना करू. अंश यांचे म्हणणे आहे की, ज्यांच्यावर भाड्याचे ओझे नसते, त्यांच्याकडे छंद जोपासण्यासाठी अधिक पैसे शिल्लक राहतात. समान पगार असूनही जे स्वतःच्या घरी राहतात, त्यांची जीवनशैली अशी असते की जणू ते दुप्पट कमावतात. हे शक्य होते कारण ते त्यांच्या पालकांनी विकत घेतलेल्या घरात राहतात. आपला अनुभव सांगताना अंश यांनी स्पष्ट केले की, ८ हजार रुपयांचे शूज खरेदी करण्यापूर्वी त्यांना दोनदा विचार करावा लागतो. ज्यांना भाडे द्यावे लागत नाही, ते बचत करूनही विचार न करता महागड्या वस्तू खरेदी करतात.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
अंश यांनी असेही म्हटले आहे की, एकटे राहणाऱ्या लोकांवर केवळ भाड्यामुळेच नाही, तर मोलकरीण, किराणा, वीज, वाय-फाय आणि घराची दुरुस्ती यांसारख्या खर्चांमुळेही मासिक बजेटवर ताण येतो. घर सांभाळण्याचा मानसिक ताणही काही कमी नसतो. काय जेवण करायचे याचे नियोजन करणे, कपडे धुणे आणि खर्चाचा हिशोब ठेवणे ही सर्व डोकेदुखीची कामे आहेत. मात्र अंश यांनी आपली परिस्थिती मान्य केली आहे. ही त्यांची स्वतःची निवड होती, असे त्यांनी सांगितले. ते आपल्या गावी परत जाऊन या सर्व सुविधांचा आनंद घेऊ शकले असते, पण त्यांनी मुंबईत काम करणे निवडले. दरम्यान, या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान शहरांतील लोकांसाठी आयुष्य कधीच सोपे नसते, पण हे संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतात, असे काहींनी म्हटले आहे. पगारदार लोकांनी व्यावसायिकांचा मत्सर करायला हवा, जे जास्त कमावतात पण कमी कर भरतात, अशीही एक प्रतिक्रिया आली. आणखी एकाने याची तुलना न्यूयॉर्कमधील जास्त भाड्याशी केली. आजकाल पुढच्या पिढीसाठी मेट्रो शहरात १ बीएचके फ्लॅट खरेदी करणे ही सर्वोत्तम भेट आहे, असेही एकाने सुचवले.
Leave a Reply