चीनची नजर आता चंद्रावर कायमस्वरूपी ठाण मांडण्यावर आहे. चंद्रावर माणसांना राहता यावं, यासाठी चीनने तयारी सुरू केली आहे. चंद्रावर पाणी आणि ऑक्सिजन तयार करण्याची चाचणी २०३० पर्यंत पूर्ण करण्याचं चीनचं लक्ष्य आहे. चीनच्या या तयारीमुळे चंद्रावर आपलं ठिकाण निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा आणखी वाढली आहे.
## चीनची टप्प्याटप्प्याने योजना
चीनच्या चंद्र मोहिमेचे मुख्य रचनाकार वू वेइरेन यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जर्नल ऑफ डीप स्पेस एक्सप्लोरेशनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या एका संशोधन अहवालात त्यांनी आणि त्यांच्या टीमने चीनच्या पुढील योजनांची माहिती दिली आहे.
या अहवालानुसार, चीनला २०३० पर्यंत चंद्रावर एक तरी महत्त्वाचं तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवावं लागेल. यासाठी पुढील चांग-ए रोबोटिक मोहिमेचा किंवा माणसांना चंद्रावर पाठवण्याच्या नियोजित मोहिमेचा वापर केला जाऊ शकतो.
चीनची योजना केवळ प्रयोग करण्यापुरती मर्यादित नाही. २०४० पर्यंत चंद्रावर एक छोटा डेमो प्लांट उभारण्याचं चीनचं नियोजन आहे. या ठिकाणी पाणी, ऑक्सिजन आणि बांधकामासाठी लागणारं साहित्य तयार केलं जाणार आहे. त्यानंतर २०५० पर्यंत चंद्रावर मोठ्या प्रमाणात खाणकाम म्हणजेच मायनिंग सुरू करण्याची चीनची योजना आहे.
वू वेइरेन यांच्या मते, येत्या एका पिढीत अंतराळातील मायनिंग हा एक मोठा उद्योग बनू शकतो. पुढील २० वर्षे अंतराळातील साधनसंपत्तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतील, असं त्यांनी आपल्या संशोधनात म्हटलं आहे.
## अमेरिका चीनपेक्षा पुढे कशी?
चीनने चंद्रावर पोहोचण्यासाठी मोठी तयारी सुरू केली असली, तरी या बाबतीत अमेरिका अजूनही पुढे असल्याचं संशोधकांनी मान्य केलं आहे. चीनने अंतराळातील साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठी अद्याप स्वतंत्र धोरण किंवा मध्यम आणि दीर्घकाळासाठीची योजना जाहीर केलेली नाही, असं संशोधकांनी सांगितलं आहे. याशिवाय अमेरिका गेल्या २० वर्षांहून अधिक काळ चंद्रावरील साधनसंपत्तीला आपल्या अंतराळ मोहिमांचा महत्त्वाचा भाग मानत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी २००४ मध्येच नासाला चंद्रावरील साधनसंपत्तीचा वापर कसा करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर २०१५ मध्ये अमेरिकेत एक कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार, अमेरिकेच्या नागरिकांना अंतराळातून मिळवलेल्या वस्तूंवर मालकी हक्क ठेवता येतो आणि या वस्तू विकण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
२०२० मध्ये ट्रम्प प्रशासनाने एक महत्त्वाचा आदेश जारी केला होता. त्यानुसार, अमेरिका अंतराळाला संपूर्ण जगाची सामायिक मालमत्ता मानत नाही. उलट अमेरिकेच्या नागरिकांनी अंतराळातील साधनसंपत्तीचा वापर आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करावा, असं या आदेशात म्हटलं होतं.
याच वर्षी नासाच्या आर्टेमिस मोहिमेतही चंद्रावरील साधनसंपत्तीला महत्त्व देण्यात आलं. चंद्रावर कायमस्वरूपी तळ उभारण्यासाठी आणि भविष्यात माणसांना मंगळावर पाठवण्यासाठी या साधनसंपत्तीचा उपयोग होऊ शकतो, असं नासाने स्पष्ट केलं होतं.
अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा केवळ चंद्रावर पाणी, ऑक्सिजन किंवा इतर कोणती साधनं आहेत, यापुरती मर्यादित नाही. अंतराळातील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्याचीही दोन्ही देशांची तयारी सुरू आहे. संशोधकांनी आपल्या अहवालात अंतराळातील काही ठिकाणांचा विशेष उल्लेख केला आहे. ही ठिकाणं देशांच्या अंतराळातील हक्क जपून ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकतात. यामध्ये लॅग्रेंज पॉइंट्सचा समावेश आहे. लॅग्रेंज पॉइंट्स म्हणजे अशी ठिकाणं, जिथे पृथ्वी आणि चंद्र किंवा सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांचा समतोल साधतात. त्यामुळे या ठिकाणी अंतराळयान फार कमी इंधन वापरून एकाच जागी स्थिर राहू शकतं.
Leave a Reply