हिवाळा आला की हवेतील आर्द्रता कमी होते आणि त्याचा थेट परिणाम त्वचेवर तसेच टाळूवर होतो. टाळू कोरडे पडल्याने डोक्यात खाज सुटते आणि कोंड्याची समस्या वाढते. बाजारातील शॅम्पू वापरण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक साहित्यापासून अँटी-डँड्रफ शॅम्पू तयार करता येतो. कडुलिंबाची पाने आणि कोरफड यांचा वापर यात महत्त्वाचा ठरतो.
शॅम्पू तयार करण्यासाठी काय लागेल?
हा शॅम्पू बनवण्यासाठी ३-४ तुकडे शिकेकाई, ४-५ तुकडे रिठा, ८-१० कडुलिंबाची पाने, १ चमचा मेथीदाणे, २ चमचे ताजे कोरफडीचे जेल आणि २-३ कप पाणी लागते. हे सर्व साहित्य सहज उपलब्ध होते आणि यात कोणतेही रसायन वापरले जात नाही.
तयार करण्याची पद्धत आणि वापर
शिकेकाई, रिठा आणि मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यात कडुलिंबाची पाने आणि पाणी घालून १०-१५ मिनिटे मंद आचेवर उकळा. मिश्रण थंड झाल्यावर रिठा आणि शिकेकाईच्या बिया काढून ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर मिश्रण गाळून त्यात कोरफडीचे जेल मिसळा. केस धुताना १-२ चमचे शॅम्पू टाळूला लावा आणि २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. हा शॅम्पू आठवड्यातून दोन वेळा वापरता येतो. रिठा आणि शिकेकाईमधील सॅपोनिनमुळे टाळूवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होते, तर कोरफड आणि मेथीदाणे केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करू शकतात.
Leave a Reply