नागपूरमध्ये होणाऱ्या न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चाआधी आमदार रोहित पवार यांना त्यांच्याच पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांना या आंदोलनात सहभागी न होण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे मोर्चाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विदर्भातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना रोहित पवार यांच्या आंदोलनात न जाण्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी नागपूरमध्ये विदर्भातील शहराध्यक्ष तसेच ग्रामीण आणि शहरी जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. शेगाव ते बुटीबोरी मार्गे नागपूर विधान भवनावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात रोहित पवार यांची बैठक झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना वेगळ्याच सूचना दिल्या.
केवळ प्रदेश कार्यालयातून येणाऱ्या सूचनांचेच पालन करावे, असे विदर्भातील तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. रोहित पवार यांच्या कोणत्याही चळवळीत किंवा आंदोलनात सहभागी होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षातील चर्चांचे पार्श्वभूमी
गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार यांनी एका अपघात प्रकरणावरून महायुती सरकारवर सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली आहे.
दरम्यान, शरद पवार गट केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आपण सत्तेत जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्ष सत्तेत सहभागी झाला तर पर्यायी मार्ग निवडण्याची भूमिका त्यांनी मांडली होती. त्यामुळे रोहित पवार यांना डावलले जात असल्याची चर्चा सुरू असून, आता ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply