बाईक टॅक्सी सेवांच्या विरोधात राज्यातील काही संघटनांनी आज संप पुकारला आहे. मात्र मुंबई आणि एमएमआरडी परिसरात हा संप लागू होणार नाही. मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत आज ऑटो रिक्षा आणि टॅक्सी नेहमीप्रमाणे धावणार आहेत.
मुंबईत मात्र वाहतूक सुरळीत
युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी स्पष्ट केले की, राज्यभरात काही संघटनांनी बंद पुकारला असला, तरी मुंबई आणि एमएमआरडी क्षेत्रात त्यांच्या युनियनने बंदची भूमिका घेतलेली नाही. त्यांची युनियन या परिसरात मोठी असून, आज मुंबईत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सीला सर्वप्रथम विरोध त्यांच्याच युनियनने केला होता, असेही त्यांनी सांगितले.
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर आक्षेप
गेल्या आठवड्यात कृती समितीच्या सर्व संघटनांच्या नेत्यांची परिवहन आयुक्तांसोबत बैठक झाली. त्यात बेकायदेशीर बाईक टॅक्सीचा मुद्दा मांडण्यात आला आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राव यांच्या मते, बाईक टॅक्सी चालवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर कोण नोंदणी करतं, याची कुठेही तपासणी होत नाही. पोलीस पडताळणी होत नाही. अॅपवर कागदपत्रं दिली की लगेच नोंदणी होते. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही बाईक टॅक्सी चालवत आहेत, ही बाब जनतेसाठी अत्यंत चुकीची आणि भीतीदायक असल्याचे त्यांनी म्हटले.
बेकायदेशीरपणे भाडे घेणाऱ्या बाईक टॅक्सींवर पंधरा दिवसांच्या आत कारवाई सुरू करावी, अशी मागणी युनियनने केली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आश्वासन पूर्ण झाले नाही, तर पंधरा-वीस दिवसांनंतर पुढची भूमिका घेतली जाईल, असेही सांगण्यात आले.
सीएनजी सबसिडीची मागणी
बेकायदेशीर बाईक टॅक्सीमुळे ऑटो रिक्षा चालक-मालक, टॅक्सी चालक-मालक आणि अॅग्रीगेटर कॅब चालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे राव यांनी सांगितले. अॅप प्लॅटफॉर्मवर बाईक नोंदणी करण्यालाच बंदी आली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. कोणतीही सेवा आली तरी भाडं नाकारणं योग्य नाही, पण सरकारने ई-बाईक टॅक्सीसाठी जी पॉलिसी बनवली आहे, त्यानुसारच सेवा द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच झालेली भाडेवाढ अपुरी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर दोनदा सीएनजीचे दर वाढले आहेत. त्यामुळे सीएनजीवर सबसिडी द्यावी, अशी मागणी युनियनने केली आहे. जेणेकरून रिक्षा चालकांना त्रास होणार नाही आणि जनतेवरही भार पडणार नाही.
Leave a Reply