बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आल्या आहेत. उषा काकडे यांच्या पॉडकास्टमध्ये बुरखा आणि हिजाब या विषयावर बोलताना त्यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली. ‘मला बुरखा घालू नको असं सांगितलं, तर मी तीन बुरखे घालेन,’ असे त्या म्हणाल्या.
कुराणात बुरख्याचा उल्लेख नाही, असा दावा
या पॉडकास्टमध्ये शबाना आझमी यांनी कुराण आणि महिलांच्या पोशाखाबाबत आपली समजूत मांडली. महिलांनी विशिष्ट प्रकारचा बुरखा परिधान करावा, असे कुराणात कुठेही स्पष्टपणे सांगितलेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी स्त्री आणि पुरुष दोघांच्याही नजरेत नम्रता आणि सभ्यता असावी, असा संदेश देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. धर्माच्या शिकवणीचा चुकीचा अर्थ लावणाऱ्या मध्यस्थांमुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.
पोशाखाची सक्ती नको, अशी स्पष्ट भूमिका
शबाना आझमी यांनी स्पष्ट केले की त्या स्वतः बुरखा परिधान करत नाहीत. मात्र एखाद्याने त्यांना बुरखा घालू नका असे सांगितले, तर त्या मुद्दाम तीन बुरखे घालतील. एखाद्या व्यक्तीने काय परिधान करावे किंवा करू नये, हे दुसऱ्याने ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशी त्यांची भूमिका आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मूलतत्त्ववादाला प्रोत्साहन दिले जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी २०२२ मध्ये कर्नाटकातील हिजाब वादाच्या वेळीही शबाना यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी अभिनेत्री कंगना राणौत यांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना शबाना यांनी भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही देश असल्याचे सांगितले होते.
याच पॉडकास्टमध्ये शबाना यांनी कलाकारांच्या राजकारणातील प्रवेशावरही भाष्य केले. कलाकारांनी राजकारणात जाणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र केवळ सन्मानाचे पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी राजकारणात प्रवेश करू नये, असे त्यांचे मत आहे. कलाकारांना समाजाकडून भरपूर प्रेम आणि प्रसिद्धी मिळते, त्यामुळे राजकारणात आल्यानंतर त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
Leave a Reply