बॉलिवूडमध्ये मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत असले, तरी हिंदी सिनेमात काम करताना त्यांना अनेकदा वेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असाच एक अनुभव सांगितला आहे. सुभाष घई यांच्या जान या सिनेमात काम करताना त्यांना परदेशात वाईट वागणूक मिळाली होती. त्या सिनेमात अजय देवगण, ट्विंकल खन्ना आणि जॉनी लिव्हर यांच्यासोबत त्या होत्या. एका गाण्याचे चित्रीकरण स्वित्झर्लंडमध्ये होणार होते आणि त्याच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान होत्या.
विमानतळावर कोणीच घ्यायला आले नाही
घई यांच्या भावाने प्रिया बेर्डे यांना फोन करून सांगितले की, झुरिचला तुमचे तिकीट आहे, तुम्ही जेनिव्हात उतरा, तिथून चित्रीकरणाचे ठिकाण जवळ आहे. बाकी सर्व कलाकार आधीच ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांची वाट पाहत होते. प्रिया बेर्डे आणि त्यांची हेअरड्रेसर विमानतळावर उतरल्या, पण त्यांना घ्यायला कोणीच आलेले नव्हते. अनोळखी शहरात काय करावे हे त्यांना कळत नव्हते. त्यांना फक्त शहराचे नाव आणि एक कोड नंबर दिला होता. तिथे भाषेचाही प्रश्न होता. फोन करायचा झाला तर आधी पाचशे डॉलर्स भरावे लागणार होते, पण तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते, कारण त्या काळात मानधन फारसे मिळायचे नाही. तिथेच थांबलेल्या असताना एक सरदारजी आले आणि त्यांनी एकट्याने तिथे थांबू नका, कारण इथे मुलींना उचलून नेले जाते, असे सांगितले. हे ऐकून त्यांची हेअरड्रेसर घाबरली. त्यानंतर त्यांनी हॉटेलचा नंबर शोधून सुखरूप पोहोचले.
जॉनी लिव्हर यांनी शूटिंग थांबवले
तोपर्यंत जॉनी लिव्हर यांनी सर्वांना सांगितले होते की, तुम्ही तिच्यासोबत जे काही केले ते चांगले नाही केले. ती येईपर्यंत मी शूटिंग करणार नाही. प्रिया बेर्डे पोहोचल्यावर त्यांनी त्यांना विचारले की, तुम्हाला बरे वाटत आहे का? बरे वाटत असेल तरच पुढे शूटिंग सुरू करू, नाहीतर नाही. त्यानंतर जॉनी लिव्हर यांनी संपूर्ण युनिटला बोलावून सांगितले की, ही मराठी अभिनेत्री आहे, महाराष्ट्रीयन आहे म्हणून तिने सर्व काही सांभाळून घेतले. इथे कोणती हिंदी अभिनेत्री असती तर तिने सांभाळून घेतले नसते, तिने अॅटीट्यूड दाखवला असता. नंतर मॅनेजर येऊन त्यांना सॉरी म्हणाला होता. प्रिया बेर्डे यांनी ही आठवण एका मुलाखतीत सांगितली होती.
Leave a Reply