जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी त्यांच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. कुठे सूर्य अनेक दिवस मावळतच नाही, तर कुठे महिनोनमहिने सूर्यदर्शन होत नाही. मात्र, या सगळ्यांहून वेगळे एक ठिकाण आहे, जिथे वर्षातील बहुतांश दिवस रात्रीच्या आकाशात विजांचा लखलखाट पाहायला मिळतो. वर्षातील सरासरी २९७ दिवस या परिसरात वादळी ढग तयार होतात. हे ठिकाण म्हणजे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशातील माराकायबो सरोवर. या नैसर्गिक घटनेला ‘कॅटाटुम्बो लाइटनिंग’ असे नाव देण्यात आले आहे.
हे सरोवर आहे तरी कुठे?
माराकायबो सरोवर हे व्हेनेझुएलाच्या वायव्य भागात आहे आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर म्हणून ते ओळखले जाते. या सरोवराच्या परिसरात अँडीज पर्वतरांगा, उष्ण पाण्याचा मोठा साठा आणि कॅरिबियन समुद्राकडून येणारे वारे यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. याच भौगोलिक रचनेमुळे तिथे वारंवार वादळे तयार होतात. विशेष म्हणजे या परिसरात रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट अधिक प्रमाणात होतो.
वर्षातील २९७ दिवस वीजा का चमकतात?
अमेरिकन मेटेरॉलॉजिकल सोसायटीच्या संशोधनानुसार, माराकायबो सरोवराच्या परिसरात वर्षाला सरासरी २९७ दिवस वादळी ढगांची निर्मिती होते. यामागे या प्रदेशातील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे. सरोवरातील पाणी वर्षभर उबदार असते. त्याचे तापमान साधारण २८ ते ३१ अंश सेल्सिअस असते. त्यामुळे पाण्यातून मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होते. दुसरीकडे, अँडीज पर्वतरांगांमधून खाली येणारे थंड वारे आणि सरोवराकडून वर जाणारी उष्ण, दमट हवा एकमेकांना भिडतात. तसेच समुद्राकडून येणारे वारे आणि पर्वतीय वाऱ्यांचा परस्परांशी होणारा संयोग यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होते. परिणामी आकाशात मोठ्या प्रमाणात वादळी ढग तयार होतात आणि विजांचा कडकडाट सुरू होतो.
रात्रीच्या अंधारात दिसते अद्भुत दृश्य
या नैसर्गिक घटनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच्या वेळी दिसणारा विजांचा लखलखाट. विशेषतः मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या परिसरात विजांची सक्रियता अधिक असते. संशोधनानुसार, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वीजा अधिक कडाडतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात तिथे विजांची सक्रियता अधिक नोंदवली जाते. काही वादळी सत्रे अनेक तास सुरू राहू शकतात. त्यामुळे काळोख्या आकाशात सतत चमकणाऱ्या विजांमुळे संपूर्ण परिसर एखाद्या प्रकाशाच्या खेळासारखा दिसतो.
माराकायबो सरोवरातील विजांचा हा लखलखाट केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर त्याला ऐतिहासिक संदर्भही आहे. पूर्वी कॅरिबियन समुद्रातून प्रवास करणारे खलाशी रात्रीच्या वेळी या विजांच्या प्रकाशाचा उपयोग दिशादर्शक म्हणून करत असत. त्यामुळे या घटनेला ‘लाइटहाऊस ऑफ कॅटाटुम्बो’ असेही म्हटले जाते. आजही हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक रात्रीच्या वेळी बोटीतून प्रवास करतात.
Leave a Reply