सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कुत्रा चावल्यानंतर रेबीज; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

बोरिवडेच्या आठ वर्षांच्या रेवती चौगुले हिचा रेबीजमुळे मृत्यू झाला. दसऱ्याला कुत्रा चावल्यानंतर महिनाभराने लक्षणे दिसली; सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.

कुत्रा चावल्यानंतर रेबीज; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे येथे रेबीजमुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. जवाहर विद्यामंदिर शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारी रेवती संतोष चौगुले हिच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे बोरिवडे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दसऱ्याला पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी रेवती शेजाऱ्यांना आपट्याची पाने म्हणजेच ‘सोनं’ वाटत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. घाबरलेली रेवती पळताना गटारीत पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ती बरी झाली आणि पुन्हा नेहमीप्रमाणे हसत-खेळत राहू लागली.

महिनाभरानंतर लक्षणे दिसू लागली

मात्र महिनाभरानंतर, १९ नोव्हेंबरपासून रेवतीला अचानक चक्कर येणे, डोळे पांढरे होणे आणि पाण्याची भीती वाटणे अशी रेबीजसदृश लक्षणे दिसू लागली. त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी तिला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. रेबीजची तीव्र लक्षणे असल्याने डॉक्टरांनी तिला विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू केले. संसर्गाचा धोका असल्याने नातेवाईकांना तिच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली होती.

विलगीकरण कक्षात वेदनेने तडफडणारी रेवती आपल्या आई-वडिलांना पाहून ‘मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या’ अशी आर्त हाक मारत होती. लेकीच्या या यातना पाहून हतबल आई-वडील ढसाढसा रडत होते, पण ते काहीच करू शकत नव्हते. अखेर शनिवारी पहाटे तिची प्राणज्योत मालवली.

रेवतीचे वडील संतोष सेंट्रिंगच्या कामाला जातात, तर आई सुरेखा मोलमजुरी करून संसार चालवतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असूनही हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावामुळे शाळेत आणि गल्लीत रेवतीचे अनेक मित्र-मैत्रिणी होते, असे सांगितले जात आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance