इंदूर : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रेल्वेकडून खेळणाऱ्या उत्तर प्रदेशच्या मध्यमगती वेगवान गोलंदाज जमशेद आलमने पदार्पणाच्या सामन्यातच ऐतिहासिक कामगिरी केली. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, पुढील षटकात आणखी एक विकेट घेत त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये पाच विकेट्स पूर्ण केल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे रेल्वेने हा सामना २९ धावांनी जिंकला.
या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ आठ विकेट्स गमावून १५३ धावाच करू शकला. सौराष्ट्रच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी जमशेद मैदानात आला. आपल्या पहिल्याच षटकात त्याने हार्विक देसाई, प्रेरक मांकड, रुचित अहीर आणि समर गज्जर यांना सलग चार चेंडूंवर बाद केले. त्यानंतर पुढील षटकात सिद्धार्थ राणाला माघारी धाडत त्याने पाच विकेट्सचा टप्पा गाठला. जमशेदने या सामन्यात ३८ धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. त्याच्या माऱ्यामुळे सौराष्ट्रची अवस्था एकवेळ सहा बाद ३० अशी झाली होती. हरवंश पांगलियाने नाबाद ८० धावांची झुंजार खेळी केली, पण ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
तिसरा भारतीय; पदार्पणात पाच बळी घेणारा सहावा गोलंदाज
जमशेद आलम सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज बनला आहे. जमशेदच्या आधी भारताच्या दोन गोलंदाजांनी पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने नोव्हेंबर २०१९ मध्ये हरियाणाविरुद्ध, तर विदर्भाच्या दर्शन नळकांडेने नोव्हेंबर २०२१ मध्ये कर्नाटकविरुद्ध हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे, या दोघांनीही डावाच्या २०व्या षटकात ही कामगिरी केली होती.
जागतिक स्तरावरही कामगिरी खास
पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये जमशेदपेक्षा कमी चेंडूंमध्ये पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम भारताबाहेरील केवळ दोन गोलंदाजांनी केला आहे. इंडोनेशियाच्या गेडे प्रियंदनाने कंबोडियाविरुद्ध सहा चेंडूंमध्ये, तर फिनलंडच्या महेश तांबेने एस्टोनियाविरुद्ध आठ चेंडूंमध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. या दोन्ही कामगिरी २०२५ मध्ये झाल्या होत्या. पदार्पणाच्या सामन्यातच अशा ऐतिहासिक कामगिरीने जमशेद आलमने स्वतःचे नाव विक्रमांच्या यादीत नोंदवले आहे.
Leave a Reply