उत्तर प्रदेशमध्ये रविवारी संध्याकाळी सहा वाजताच संपूर्ण राज्यात अचानक अंधार पसरला. राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांमधील वीजपुरवठा एकाच वेळी बंद करण्यात आला. त्यानंतर हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवण्यात आला. तब्बल दोन मिनिटे हा सायरन वाजत होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला. मात्र हा कोणताही प्रत्यक्ष हल्ला नसून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मॉक ड्रिल होती.
७५ जिल्ह्यांत एकाच वेळी मॉक ड्रिल
युद्ध, हवाई हल्ले किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे संरक्षण कसे करायचे आणि संबंधित यंत्रणांनी कशा प्रकारे काम करायचे, याची तयारी तपासण्यासाठी ही मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील नागरी संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सिव्हिल डिफेन्स एअर रेड आणि ब्लॅकआऊट मॉक ड्रिल घेण्यात आली. नियोजित कार्यक्रमानुसार रविवारी संध्याकाळी सहा वाजता संपूर्ण राज्यातील वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्याचवेळी हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजवण्यात आला. या सायरनचा आवाज जवळपास दोन मिनिटे सुरू होता. यावेळी वाहतूक थांबवणे, रस्त्यांवर थांबवण्यात आलेल्या वाहनांचे हेडलाइट आणि इतर दिवे बंद करणे, अशा प्रक्रियांचा सराव करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांनी वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. तसेच वाहतूक पूर्ववत करण्याचाही सराव करण्यात आला. प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस अधिकारी स्वतः उपस्थित होते.
मॉक ड्रिलचा उद्देश काय?
ब्लॅकआऊटच्या परिस्थितीत विविध सरकारी विभागांमधील समन्वय, आपत्कालीन प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थेची चाचणी घेणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा किती वेगाने आणि समन्वयाने काम करतात, हे या सरावातून तपासले गेले.
Leave a Reply