सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापन समित्यांच्या पुनर्गठनात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच केंद्र सरकारच्या शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात (२०२६) सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
३,४१९ शाळांमध्ये पुनर्रचना पूर्ण
केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शिकेनुसार जिल्ह्यातील ३ हजार ४१९ शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांची पुनर्रचना नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे आणि शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली.
गुणवत्ता निर्देशांकात ४०० गुणांचा टप्पा पार
शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांकात (२०२६) पहिल्यांदाच ४०० गुणांचा टप्पा पार करत सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ही बाब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या यशामुळे सातारा जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
नेतृत्वाला यशाची मोहोर
या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे म्हसवड (विरकरवाडी) येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्षांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. याशनी नागराजन यांच्यासह शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक आणि घटकांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळातही साताऱ्याचा शैक्षणिक आलेख असाच उंचावत राहील, असा विश्वास अध्यक्ष विशाल विरकर यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply