घरात एखादा प्राणी पाळला की तो फक्त प्राणी राहत नाही, तर कुटुंबाचाच एक सदस्य बनतो. त्याच्या आवाजाने घर गजबजते आणि तो नसला की संपूर्ण घर शांत होते. वाराणसीतील एका कुटुंबाचा दहा वर्षांचा सोबती, त्यांचा लाडका पोपट अॅलेक्स, अचानक घरातून उडून गेल्याने संपूर्ण कुटुंब निराश झाले आहे. त्याला सुखरूप घरी परत आणण्यासाठी कुटुंबाने काशीच्या गल्लीबोळांत त्याचे पोस्टर लावले असून शोधून आणणाऱ्याला ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
१६ नोव्हेंबरला काय घडले
वाराणसीच्या दारानगर परिसरात अरविंद मौर्य यांचे कुटुंब राहते. जवळपास दहा वर्षांपूर्वी त्यांनी अॅलेक्स नावाचा पोपट पाळला होता. इतक्या वर्षांत तो घरातील प्रत्येकाशी चांगलाच रुळला होता. घरात त्याची सततची वर्दळ, आवाज आणि खेळकरपणा यामुळे वातावरण आनंदी राहायचे. मात्र १६ नोव्हेंबरला घरात टाईल्स बसवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी मशीनचा मोठा आवाज होत होता. या आवाजाने अॅलेक्स घाबरला आणि घरातून उडून गेला. सुरुवातीला कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. पण कुठेही त्याचा पत्ता लागला नाही.
पोस्टर आणि बक्षीस
अॅलेक्सचा शोध घेण्यासाठी अरविंद मौर्य, त्यांचे मुलगे आणि कुटुंबातील इतर सदस्य आता वाराणसीच्या वेगवेगळ्या भागांत फिरत आहेत. त्यांनी अॅलेक्सचा फोटो असलेली पोस्टर लावली आहेत. या पोस्टरवर त्याला शोधून सुरक्षित घरी आणणाऱ्या व्यक्तीला ११ हजार रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. तरीही अॅलेक्स सापडला नाही, तर ही रक्कम वाढवून २१ हजार रुपये केली जाणार आहे. त्याशिवाय भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
या सगळ्यात आणखी एक भावूक करणारी गोष्ट म्हणजे घरातील कुत्राही उदास झाला आहे. घरातील कुत्रा सतत अॅलेक्ससोबत खेळत असायचा, त्यांची छान मैत्री जमली होती. मात्र त्याच्या जाण्याने तो उदास झाला आहे. आता संपूर्ण कुटुंब अॅलेक्सच्या परतण्याची वाट पाहत आहे.
Leave a Reply